घाटीत ६० वर्षांत पहिल्यांदा एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:39+5:302021-02-05T04:22:39+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविकच असते; पण वयाच्या ३८ व्या ...

घाटीत ६० वर्षांत पहिल्यांदा एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपण
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविकच असते; पण वयाच्या ३८ व्या वर्षीच एका महिलेचे गुडघे संधीवातामुळे वाकडे झाले. परिणामी चालणेही अशक्य झाले. दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपण करण्याची वेळ ओढावली. खासगी रुग्णालयात त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार होती. मात्र, घाटी रुग्णालयाने महिलेला आधार दिला. शिवाय ६० वर्षांत पहिल्यांदा एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे आव्हानही डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पेलले. त्यामुळेच ही महिला रुग्णालातून चालत घरी गेली.
शशीकला डोंगरे (रा. नांदेड) असे या महिलेचे नाव आहे. संधिवातामुळे त्यांचे दोन्ही पाय वाकडे झाले होते. हलाखीची परिस्थिती असल्याने खासगी उपचार घेणे परवडणारे नव्हते. उपचारासाठी ३० नोव्हेंबर रोजी त्या घाटीत दाखल झाल्या. डॉक्टरांनी एकाच वेळी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी एका वेळी एका गुडघ्याचे आणि दुसऱ्या गुडघ्याची नंतर शस्त्रक्रिया करण्यात येत होती; परंतु घाटीत प्रथमच दोन्ही गुडघ्यांची एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन झाले. ८ डिसेंबर रोजी शस्त्रक्रियेदरम्यान अधिक रक्तस्राव होणार नाही, याचे आव्हान पेलत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, डॉ. अनिल धुळे, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. सतीश गवळी, डॉ. अब्दुल्ला अन्सारी, डॉ. राजश्री सोनवणे, इंजार्च सिस्टर शीला इंगल, दीपाली पाठक, आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. महिलेला शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
संधिवातात हाडे होतात ठिसूळ
घाटीत प्रथमच दोन्ही गुडघ्यांचे एकाच वेळेस सांधेराेपणाची शस्त्रक्रिया झाली. काहीही आजार नसेल तर अशाप्रकारे एकाच वेळी दोन्ही पायांच्या शस्त्रक्रिया करता येतात. महिलेला चालताही येत नव्हते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर ती चालत घरी जाऊ शकली. संधिवातात हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे सांधेरोपणाची वेळ ओढावते.
- डॉ. एम. बी. लिंगायत, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख, घाटी
फोटो ओळ...
१) दोन्ही गुडघ्यांचे सांधेरोपण झालेली महिला.
२) शस्त्रक्रियेपूर्वी गुडघ्यांची अवस्था दाखविणारे एक्सरे.
३) डॉ. एम. बी. लिंगायत, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख, घाटी