२० वर्षांपासून वैजापूरकरांचा सरकारविरोधी कौल
By Admin | Updated: October 27, 2014 00:12 IST2014-10-26T23:50:07+5:302014-10-27T00:12:30+5:30
विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता गेल्या २० वर्षांपासून म्हणजेच चार विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीपासून सरकारविरोधी कौल देत आहे.

२० वर्षांपासून वैजापूरकरांचा सरकारविरोधी कौल
विजय गायकवाड, वैजापूर
वैजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता गेल्या २० वर्षांपासून म्हणजेच चार विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीपासून सरकारविरोधी कौल देत आहे. यंदाच्या निवडणुकीतही वैजापूरकरांनी हीच परंपरा कायम ठेवली.
वैजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने गेल्या २० वर्षांपासून सरकार विरोधी कौल देऊन आगळावेगळा विक्रम केला. वैजापूर मतदारसंघ नेहमीच सत्तेच्या विरोधात राहिला. परिणामी आतापर्यंत मतदारसंघात जो विकास व्हायला हवा तो झाला नाही. जनतेचा कौल सत्तेच्या विरोधात राहिल्याने वैजापूर मतदारसंघाला तसे झुकते माप मिळत नाही. यंदाही राज्यात सेना-भाजपाची सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे.
१९९५ पासून २०१४ पर्यंत पाच विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनता सत्तेच्या विरोधात आहे. राज्यात सेना-भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे; परंतु यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पारड्यात जनतेने कौल टाकला. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास पाटील चिकटगावकर निवडून आले. त्यानंतर सेना-भाजपा युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत सेनेचे आ. आर.एम. वाणी यांनी १५ वर्षे प्रतिनिधित्व केले. या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते.
यंदाच्या निवडणुकीतही मतदारसंघातील जनतेने सत्तेच्या विरोधात कौल दिला. सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘साहेब मंत्री होणार’ अशा पोस्ट टाकून जोरदार प्रचार करण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु तो असफल ठरला.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो; परंतु विकासकामे खेचण्यासाठी सरकारदरबारी भांडणारा आमदार जनतेला हवाय. अशा परिस्थितीत नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची खरी कसोटी लागणार आहे. विशेषत: जनतेच्या चिकटगावकरांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. त्यांच्याकडून जनतेची अपेक्षापूर्ती किती प्रमाणात होते, हे मात्र येणाऱ्या काळात समजणार
आहे.
लाल दिव्याचे स्वप्न धुळीस
राज्यात सेना-भाजपा महायुतीची सत्ता आल्यास वैजापूरला लाल दिवा मिळेल, अशी अपेक्षा विशेषत: सेना कार्यकर्त्यांची होती; परंतु मतदारांनी आर.एम. वाणी यांच्या विरोधात कौल दिल्याने लाल दिव्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आता पाच वर्षे मतदारसंघात सरकारविरोधी आमदार राहणार आहे.
भाऊसाहेब पाटील चिकटगावर यांच्या पारड्यात यावेळी जनतेने आमदारकी टाकली आहे. जनतेला मंत्र्यांपेक्षा मोठी अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे.