पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत वैजापूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:02 IST2021-06-24T04:02:06+5:302021-06-24T04:02:06+5:30
बााबासाहेब धुमाळ वैजापूर : जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या विविध योजनेच्या अंमलबजावणीत वैजापूर कृषी उपविभाग राज्यात अव्वल ठरला आहे. नानाजी ...

पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत वैजापूर अव्वल
बााबासाहेब धुमाळ
वैजापूर : जिल्ह्यातील दुष्काळी भागात केलेल्या विविध योजनेच्या अंमलबजावणीत वैजापूर कृषी उपविभाग राज्यात अव्वल ठरला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पात वैजापूरने राज्यात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यापाठोपाठ सिल्लोड व हिंगोली कृषी उपविभागाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुष्काळी मराठवाड्यात पोकरातून अनेक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग सापडला असल्याचे पुढे आले आहे.
राज्यातील मराठवाडा व विदर्भ हे विभाग कायम दुष्काळ व अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात. सध्या वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे या भागातील शेती अधिक जोखीम व नुकसानीची ठरली आहे. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, दरडोई घटत जाणारी जमीन धारणा, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण हे सुद्धा या भागाच्या अडचणीत आणखी भर घालतात. याचा परिणाम म्हणून मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वेगाने होणारे हवामानातील बदल आपण थांबवू शकत नाही. परंतु बदलांशी शेती पद्धती जुळवून घेणे व अनुकूल करणे एवढेच आपल्या हातात आहे.
यासाठी राज्य सरकारने २०१८ - २०१९ पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यातील ५ हजार १२० गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरडवाहू शेती करणाऱ्या अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. वैजापूर कृषी उपविभाग अंतर्गत वैजापूर, गंगापूर व खुलताबाद हे तीन तालुके येतात. उपविभागातील १३५ गावांची निवड पोकरा प्रकल्पासाठी झाली आहे. या गावातील १७ हजार ४२२ लाभार्थ्यांना विविध घटकांचा ९३ कोटी ४३ लाख एवढ्या अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सामूहिक शेततळे (२०७), वैयक्तिक शेततळे खोदकाम (४२२), शेततळे अस्तरीकरण (५०८), ठिंबक सिंचन संच (५,६८१), तुषार सिंचन संच (५,०१४), इलेक्ट्रीक / डिझेल पंप (२,८१२), पाईपलाईन (१,१३१), शेडनेट गृह व पाॅलि हाऊस (१६१), फळबाग लागवड (१०९३), तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन (१५४), शेततळ्यातील मत्स्य पालन (८३), शेळीपालन (७६) आदी घटकांचा लाभ देण्यात आला आहे.
शेततळ्यामुळे संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. ठिंबक व तुषार सिंचनाचा वापर वाढल्याने दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. बहु वार्षिक फळबागा व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेडनेटगृह घटकांचा लाभ घेऊन कमी क्षेत्रात व कालावधीत अधिक उत्पादन मिळू लागले आहे. कृषी उपविभागात ८१ शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांना अवजार बँका, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, दाळ मिल, दूध शीतकरण गृह, मुरघास युनिट आदी बाबींचा लाभ देण्यात आला आहे.
---- कोट ------
पोकरा योजनेमुळे तिन्ही दुष्काळी व अवर्षण प्रवण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतमालाचे उत्पादन वाढल्याने हा प्रकल्प कोरडवाहू भागासाठी वरदान ठरला आहे.
- प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी
--- फोटो सह
230621\img-20210622-wa0223.jpg
पोखरा योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे तुती लागवड यांचे फोटो