एक वेडापीर तीन दशके जपतोय खुबसुरत उर्दू जबान!
By Admin | Updated: May 12, 2015 00:55 IST2015-05-12T00:41:53+5:302015-05-12T00:55:34+5:30
औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे

एक वेडापीर तीन दशके जपतोय खुबसुरत उर्दू जबान!
औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे. मात्र, रांगडी, रसाळ मराठी आणि नजाकतदार रुमानी उर्दू यांच्यातील अक्षरसंवादासाठी गेली तीन दशके शहरातील शायर-पत्रकार खान शमीम ‘इदारा- ए- अदब- ए- उर्दू’ या मंचाच्या माध्यमातून अबोलपणे कार्यरत आहेत.
प्रख्यात शायर दाग देहलवी यांनी लिहून ठेवले आहे की ‘उर्दू है जिसका नाम हमीं जानते है दाग; सारे जहां में धूम हमारें जबां की है.’ मात्र, काळाच्या ओघात या भाषेच्या शहराच्या गलीमोहल्ल्यात उमटलेल्या नजाकतदार पाऊलखूणा धूसर होत आहेत.
अशावेळी याचे कारण सांगताना शमीम खान परखडपणे सुनावतात, ‘बंटवारे के बाद मुल्ला-मौलवीयों ने उर्दू को बेवजह कलमा पढ़ा दिया!’ मात्र, या भाषिक ध्रुवीकरणाच्या वादळातही गेल्या सत्तावीस वर्षांपासून भाषासंवेदन जागविण्याची ही पणती खान यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ओंजळीत जपली आहे. लाल मशिदीजवळ असलेल्या त्यांच्या घरी हे वर्ग चालतात. त्यांच्या घरातली बहुभाषिक पुस्तकांनी भरलेली कपाटे लगेचच लक्ष वेधतात.
या वर्गांच्या संकल्पनेबाबत विचारले असता वयाची साठी पार केलेले खान सांगतात की उर्दू भाषा, संस्कृती व जीवनशैली ही या शहरातील मुस्लिमांच्याच नव्हे तर गैरमुस्लिमांच्याही अस्तित्वाचा भाग राहिली आहे. मात्र, काळाच्या ओघात अनेक नकोशा घटनांमुळे उर्दूवर ‘मुस्लिम भाषा’ असा शिक्का मारला गेला. मात्र, आजही उर्दूबाबत आस्था व कुतूहल असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठीच हा अट्टहास इतकी वर्षे अखंड सुरू
आहे.
आजवर किमान चारशे लोक उर्दूची मुळाक्षरे गिरवीत अस्खलित लेखन-वाचन शिकलेत. माझा विद्यार्थी सच्चिदानंद भागवत याचा तर उर्दूत एक उत्कृष्ट कवितासंग्रही प्रकाशित झाला आहे.
सध्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे सध्या माझे विद्यार्थी आहेत! त्यात माझ्यासह माझी पत्नी जरिना खान, संस्थासचिव अजहर शकील, उपाध्यक्ष हबीब पाशा हेसुद्धा शिकविण्यात सहभागी होतात.
यासह शहरातील प्रख्यात ज्येष्ठ शायर बशर नवाज येतात तेव्हा उर्दू गझलियत, अफसाने आणि नज्म यांची सुरेख मैफल रंगते. खान स्वत: शायरीतून थेट सामाजिक-राजकीय भूमिका मांडणारे तरक्कीपसंद शायर आहेत.
भाषा हा मनामनांमध्ये संवादाचे पूल बांधण्याचे शाश्वत माध्यम आहे, यावर मी विश्वास ठेवतो. जीवनाने जे शिकवले, तेच मी इतरांना सांगतो! असे ते शेवटी सांगतात.