पीएच.डी.च्या अनेक ‘गाईड’कडे जागा रिक्त
By Admin | Updated: August 6, 2016 00:23 IST2016-08-06T00:21:07+5:302016-08-06T00:23:16+5:30
औरंगाबाद :विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील पीएच.डी.च्या अनेक मार्गदर्शक प्राध्यापकांकडे जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

पीएच.डी.च्या अनेक ‘गाईड’कडे जागा रिक्त
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील पीएच.डी.च्या अनेक मार्गदर्शक प्राध्यापकांकडे जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही प्राध्यापकांनी आरआरसी (रिसर्च अॅण्ड रिकग्निशन कमिटी) चे आदेश धुडकावून लावले आहेत.
एकीकडे मार्गदर्शक होण्यासाठी आटापिटा करणारे अनेक प्राध्यापक संशोधनासाठी विद्यार्थ्यांना घेत नसल्याचे उलट चित्र आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘पेट’ उत्तीर्ण झालेल्या ४४५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक (गाईड) देण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर यासंदर्भातील नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक का उपलब्ध नाहीत, यासंबंधी शोध घेतला असता अनेक मार्गदर्शकांकडे एक किंवा दोन जागा रिक्त असल्याची माहिती मिळाली.
विद्यापीठाकडे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता घेतलेल्या सुमारे २० टक्के प्राध्यापकांकडे एक किंवा दोन जागा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. ज्यांच्याकडे जागा रिक्त आहेत, असे प्राध्यापक कामाचा बोजा वाढतो, असे कारण देऊन विद्यार्थ्यांना टाळत असल्याचे चित्र आहे. काही प्राध्यापक जातीचे आणि पै- पाहुणे असलेले विद्यार्थी मिळण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्याच जाती- धर्माचे विद्यार्थी असावेत, असा आग्रह अनेक प्राध्यापक धरत असल्याचेही भयानक वास्तव समोर येत आहे. तर ‘बकरा’ शोधण्याच्या प्रवृत्तीमुळेही काही प्राध्यापक जागा रिक्त ठेवत असल्याची माहिती मिळाली. दुसरीकडे विद्यापीठाने वर्षभरापूर्वी मान्यता दिलेल्या ‘गाईड’कडे विद्यार्थीच नसल्याचे चित्र आहे. महाविद्यालयांत काम करणाऱ्या आणि नव्याने मार्गदर्शक झालेल्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना माहिती नसते. त्यामुळे अशा मार्गदर्शकांकडे त्यांची इच्छा असूनही विद्यार्थी संख्या पूर्ण होत नाही. संशोधनासाठी आठ विद्यार्थी असलेल्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्राध्यापकाकडे केवळ तीनच विद्यार्थी आहेत. विद्यापीठानेच या प्राध्यापकाकडे विद्यार्थी दिलेले नाहीत. यामुळे जागा रिक्त आहेत.