ऊसदर आंदोलन पेटले
By Admin | Updated: January 15, 2015 00:09 IST2015-01-14T23:51:23+5:302015-01-15T00:09:36+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी साखर विभागाचे विशेष लेखा कार्यालयात तोडफोड केली़

ऊसदर आंदोलन पेटले
उस्मानाबाद : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी साखर विभागाचे विशेष लेखा कार्यालयात तोडफोड केली़ अचानक हा प्रकार घडल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती़
जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांपैकी काहीच कारखान्यांचे गाळप यंदा सुरू झाले आहे़ त्यातच गत तीन वर्षाच्या दुष्काळी स्थितीत अपुऱ्या पाण्यावर अनेकांनी उसाची जोपासना केली आहे़ मात्र, लागवड व तोडणीपर्यंतचा खर्च पाहता शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव मिळत नसल्याची तक्रार यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती़ त्यानंतरच्या कालावधीत साखर कारखान्यांनी उसाला एफारपीप्रमाणे भाव द्यावा, हमीभाव न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारी करण्यात आल्या होत्या़ तक्रारी करूनही या मागण्या मान्य होत नसल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला होता़ शिवाय शहरातील साखर विभागाच्या विशेष लेखा कार्यालयात बुधवारी निवेदन देण्यासह इतर माहिती घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्यासह पदाधिकारी गेले होते़ मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कार्यालयात एकच तोडफोड सुरू केली़ खुर्च्या, फर्निचरसह टेबलावरील काचा फोडण्यात आल्या आहेत़ घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़एम़ शेख, सपोनि राजेंद्र बनसोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पंचनामा केला आहे़ (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेल्या तोडफोड प्रकरणी सहकारी संस्था (साखर) विभागाचे विशेष लेखा परिक्षक मोहन प्रभू सलगर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ फिर्यादीत म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इंगळे व त्यांचे इतर सात ते आठ सहकारी बुधवारी दुपारी कार्यालयात आले होते़ ‘साहेब कुठे आहेत’ असे विचारल्यानंतर ‘ते बाहेर आहेत’ असे सांगून सलगर हे साहेबांना फोन लावत होते़ त्यावेळी इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची आदळआपट करीत टेबल, काचा फोडून पाच हजार रूपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ यावरून वरील आठ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार शहाणे हे करीत आहेत़