जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा सुरूच
By Admin | Updated: May 29, 2014 00:23 IST2014-05-29T00:10:12+5:302014-05-29T00:23:59+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील तब्बल ४५ वाळू घाटांचा लिलाव झाला नसून या घाटातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू
जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा सुरूच
हिंगोली : जिल्ह्यातील तब्बल ४५ वाळू घाटांचा लिलाव झाला नसून या घाटातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असताना याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी महसूल विभाग साखरझोपेतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८६ वाळू घाटांपैकी ४५ वाळू घाटांचा गतवर्षी लिलाव झाला नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लिलाव न झालेल्या वाळू घाटातून बेसुमारपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हिंगोली तालुक्यातील समगा, सावरखेडा, नर्सी नामदेव भागातील परिस्थितीचा आढावा घेतला असता येथील वाळू घाटातून अवैध वाळूचे उत्खनन केले जात असल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यातील माथा, मेथा, येडूद, तपोवन, नालेगाव आदी भागातूनही अवैध वाळू उपसा करून ही वाळू परभणी जिल्ह्यात नेली जात असल्याचे दिसून आले. प्रातिनिधीक स्वरुपामध्ये काही वाळू घाटांचा आढावा घेतला असता ही स्थिती समोर आल्याने यावर नियंत्रण ठेवणारे महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी साखरझोपेतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाचा व्याप असल्याचे कारण सांगून महसूल विभागातील अधिकारी याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते. आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे या अधिकार्यांवर फारसा ताण नाही तरीही कारवाई करण्यास हे अधिकारी तयार नाहीत. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकार्यांकडूनही याचा आढावाही घेतला जात नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)