अपूर्व उत्साहात थिरकली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:40 IST2017-09-30T00:40:28+5:302017-09-30T00:40:28+5:30
‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान प्रोझोनच्या हिरवळीवर गरबाप्रेमींची उसळलेली अलोट गर्दी वातावरणात जणू चैतन्याची आणि आनंदाची लाट घेऊन आली.

अपूर्व उत्साहात थिरकली तरुणाई
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवरात्रीचा शेवटचा दिवस गाजला तो गरबाप्रेमींच्या अपूर्व उत्साहाने. शेवटच्या दिवसानिमित्त गरबाप्रेमींमध्ये आगळाच उत्साह संचारला होता. ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान प्रोझोनच्या हिरवळीवर गरबाप्रेमींची उसळलेली अलोट गर्दी वातावरणात जणू चैतन्याची आणि आनंदाची लाट घेऊन आली.
शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंह, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, सारिका कटके, एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती झाली.
याप्रसंगी ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, संपादक सुधीर महाजन, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोळे, जि. प. सदस्या अनुराधा चव्हाण, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, विजय वाडकर, डॉ. विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, प्रणव दरख, प्रीतम दरख, संदीप काळे आदींची विशेष उपस्थिती
होती.
रात्री बारा वाजेपर्यंत न थकता, न थांबता दांडियाचा मनमुराद आनंद घ्यायचा, असे जणू दांडियाप्रेमींनी ठरवूनच टाकले होते. यामुळे अगदी शेवटपर्यंत गरबाप्रेमी त्याच जोशात थिरकत राहिले.
दांडियाप्रेमींचा उत्साह प्रेक्षकांनाही दांडियाच्या तालावर थिकरण्यास भाग पाडणारा होता. याच उत्साहामुळे अबालबृद्धांनीही तरुणाईच्या तालात ताल मिसळला आणि गरब्याचा आनंद घेतला.