छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरासह ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज, बुधवारी दुपारी शहरात अचानक वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. भर दुपारी तब्बल वीस मिनिट ते अर्धा तास अवकाळी पावसाने गाठल्याने नागरिकांची धांदल उडाली. मात्र, पाऊस पडून गेल्यानंतर उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरणात थंडावा आला आहे.
वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळे जिल्ह्यात ५ ते ८ मेदरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवार, दि. ६ मे रोजी सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सुनील गोविंदा चिरखे (२५) यांच्यावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअवर होते.
दि. ५ रोजी शहर परिसरासह वाळूजला पाऊस व गारपीट झाली. वैजापूर तालुक्यातील शिऊर आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनही पावसासह गारपिटीने हजेरी लावली. जिल्ह्यातील एकासह मराठवाड्यात एकूण तीनजणांचा वीज पडून मृत्यू झाला, पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी दिली. सिल्लोड तालुक्यामध्ये चार वाजेपासून सुसाट वारा व ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आमठाणा व भराडी मंडळात काही गावांत गारपिटीची नोंद झाली.