‘बिनविरोध’चा आज फैैसला

By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:26:49+5:302015-04-28T00:29:30+5:30

उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी तुळजापूर येथे सोमवारी झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली़

'Unrestricted' decision today | ‘बिनविरोध’चा आज फैैसला

‘बिनविरोध’चा आज फैैसला


उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी तुळजापूर येथे सोमवारी झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली़ यावेळी प्रमुख पक्षांनी जागांबाबतची मागणी एकमेकांसमोर ठेवली आहे़ यावर सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांत विचारमंथन सुरु असून, बिनविरोध निवडणूकीसंदर्भात मंगळवारी अंतीम फैसला होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे़
विविध कारणामुळे मागील अनेक वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा बँक कमालीच्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे़ याची झळ सर्वसामान्य शेतकरी सभासदांना सोसावी लागत आहे. त्यामुळेच जिल्हा बँक बिनविरोध काढून निवडणूकीच्या माध्यमातून होणारा बँकेचा खर्चही टाळावा अशी भूमिका ‘लोकमत’ने सातत्याने मांडली आहे. महत्वाचे म्हणजे सर्वपक्षियांनीही याबाबत सकारात्मक विचार करुन बँक बिनविरोध काढण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने रविवारी आयोजित बैठक झाली नाही़ त्यानंतर सोमवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली़ या बैठकीस आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ मधुकरराव चव्हाण, आ़ बसवराज पाटील, आ़ राहूल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ नितीन काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, माजी आ़ज्ञानेश्वर पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह प्रमुख राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती होती़ बैठकीमध्ये बँकेची सद्यस्थिती, भविष्यात बँकेला शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आदी विविध विषयावर चर्चा करण्यात आली़ सर्वपक्षीय पॅनल आल्यानंतर बँकेला निधी मिळण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली़ शिवाय सर्वपक्षीयांनी १५ जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा अपेक्षित आहेत़ याची माहिती बैठकीत एकमेकांसमोर ठेवली आहे़ विशेष म्हणजे जागांची मागणी ठेवताना सद्याचे पक्षीय बलाबल, भविष्यात मिळणाऱ्या जागा यावर अडून न बसता एकमेकांनी लवचिक भूमिका घेण्याचे ठरले आहे. एकमेकांनी जागांबाबत अपेक्षित मागणी एकमेकांसमोर ठेवल्यानंतर मंगळवारी पुन्हा या विषयावर सर्वपक्षीयांची बैठक होणार असून, या बैठकीत बिनविरोध निवडणुकीचा अंतीम निर्णय होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्याच्या राजकारणात हे सर्वपक्षीय मंडळी राजकीय इतिहास घडविणार की पुन्हा एकमेकांविरोधात दंड थोपटून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार ? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत परंडा सोसायटी मतदार संघातून माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपूत्र रणजित पाटील यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते़ मात्र, सोमवारी रणजित पाटील यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले आहे़ त्यामुळे आता माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील हेच ‘डीसीसी’च्या आखाड्यात उतरणार आहेत़ यापूर्वी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत़
यापूर्वी विविध विषयावरून सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याचा प्रयत्न झाला़ मात्र, या बैठकीकडे कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती़ परंतु जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने का होईना जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वपक्षीय नेतेमंडळी एका खोलीत चर्चेसाठी बसले होते़ या चर्चेतील निष्कर्ष हा ‘बिनविरोध निवडणूक’ असा निघाला तर ही जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे राजकीय तज्ज्ञांमधून बोलले जात आहे़
पळवापळवीचा विषय थंड
४जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीयांची सकारात्मक भूमिका आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत होणारी मतदार सभासदांची पळवापळवीचा विषय यंदा थंडच पडला आहे़ काहींनी मतदारांना अमिष दाखविण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी सर्वपक्षीयांच्या बैठका सुरूच असल्याने अनेकांचे लक्ष या बैठकांकडेच लागले आहे़
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छूक म्हणून २४७ जणांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत़ दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहेत़ तरी अद्यापही इतर कोणीही अर्ज काढण्यासाठी न फिरकल्याने २४४ नामनिर्देशनपत्र निवडणूक विभागाकडे आहेत़ सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मंगळवारी बिनविरोधबाबत निर्णय घेणार आहेत़ त्यानंतर बुधवारी किती जण अर्ज मागे घेतात, किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे़

Web Title: 'Unrestricted' decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.