अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2025 20:19 IST2025-06-14T20:19:21+5:302025-06-14T20:19:31+5:30

अपात्र झाले पात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ म्हणून नोकरी

Unqualified for the job; After 'staff nurse', scam in technical and non-technical recruitment also | अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

छत्रपती संभाजीनगर : ‘स्टाफ नर्स’ नियुक्तीपत्र घोटाळ्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरतीतही घोटाळा झाला आहे. अपात्र असलेले अनेक उमेदवार प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ आदी पदांवर रुजू झाले. माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून ही बाब समोर आल्याचे परीक्षार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

‘सरकारी स्टाफ नर्ससाठी नियुक्तीचा दर २० लाख’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २ जून रोजी वृत्त प्रकाशित करत स्टाफ नर्स नियुक्तीपत्र घोटाळा समोर आणला. या वृत्तानंतर तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला. तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदभरतीतही अपात्रांना नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

माहिती अधिकारातून काय आले समोर?
एक उमेदवार २०२० मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर चार वर्षांच्या ‘बीपीएमटी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ऑक्टोबर २०२४ मध्ये पदवी प्राप्त केली. परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या १० मे २०२३ रोजी पदभरतीच्या जाहिरातीनुसार २५ मे २०२३ पर्यंत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे होते. त्यानुसार उमेदवाराला अपात्र ठरवणे गरजेचे होते. परंतु त्याला पात्र ठरविण्यात आले आणि नियुक्तीही देण्यात आली. अशाचप्रकारे इतर अपात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्याचे समजते.

अपात्र उमेदवारांना नोकरी
मी माहिती अधिकाराद्वारे माहिती मिळवली आहे. त्यातून शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यापूर्वीच उमेदवाराला पात्र ठरविण्यात आले. यासारखे २५ ते ३० जण वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात प्रयोगशाळा सहायक, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे सहायक आदी पदांवर कार्यरत आहेत. या भरतीतही मोठा गैरप्रकार झालेला आहे.
-हनुमान खेत्रे, परीक्षार्थी

Web Title: Unqualified for the job; After 'staff nurse', scam in technical and non-technical recruitment also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.