अभूतपूर्व पाणीटंचाई; युद्धपातळीवर काम करा
By Admin | Updated: March 14, 2016 00:23 IST2016-03-14T00:07:42+5:302016-03-14T00:23:09+5:30
नांदेड : मराठवाड्यत अभूतपूर्व टंचाई परिस्थिती असून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधा़

अभूतपूर्व पाणीटंचाई; युद्धपातळीवर काम करा
नांदेड : मराठवाड्यत अभूतपूर्व टंचाई परिस्थिती असून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधा़ निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन सोबत असल्याचा विश्वास जनतेला द्या़ त्याकरिता शनिवार-रविवारच्या सुट्ट्या बाजूला ठेवून युद्धपातळीवर काम करा, असे निर्देश राज्याचे परिवहनमंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले़
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ़ शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे रविवारी आयोजित जिल्ह्यातील टंचाई आढाव्याच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ महापौर शैलजा स्वामी, आमदार वसंतराव चव्हाण, आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़ सुभाष साबणे, आ़ हेमंत पाटील, आ़डॉ़तुषार राठोड यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी, जलसंपदा, पशूसंवर्धन आदी विभागांतील अधिकारी उपस्थित होते़
पालकमंत्री दिवाकर रावते म्हणाले, टंचाई परिस्थिती लक्षात घेवून दर शुक्रवार, शनिवार अणि रविवारी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरचे नियोजन करा़ निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन जनतेसोबत असल्याचा विश्वास निर्माण करा़ ग्रामसेवक, तलाठी यासोबतच ग्रामपातळीवरील शेवटच्या घटकांसोबतचा संवाद वाढवून जनतेच्या अडचणी सोडवा़ लोकसहभाग देण्यासाठीची मानसिकता बदलली असून लोकांच्या या पुढाकाराला प्रतिसाद देत योजना यशस्वी कराव्यात, असे त्यांनी सांगितले़
बैठकीत पालकमंत्री रावते यांनी पिण्याचे पाणी, जनावरांसाठीचे पाणी-चारा, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, नाल्याचे पुनरूज्जीवन, रोजगार हमी योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा, खरीप हंगामासाठीची तयारी आणि दुष्काळ निधीच्या वितरणाबाबतचा सर्वंकष आढावा घेतला़ टँकरद्वारे पाणी पुरवठ्यात टँकर भरण्यासाठी वीज पुरवठा अखंडित व भारनियमनमुक्त रहावा यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री रावते यांनी दिले़ जनावरांसाठीच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकर व्यवस्था आणि गावागावांत सामुदायिक हौद पद्धती वापरण्याची सूचना केली़
खरीप हंगामाच्या तयारीबाबत बोलताना पालकमंत्री रावते म्हणाले, पावसाचा अंदाज घेवूनच पीक पेऱ्यामध्ये आणि पीकपद्धतीत बदल करण्याचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात यावे़ तूर हे मराठवाड्याचे मुख्य आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे़ त्याबाबत आणि त्यामधील आंतरपीक पद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती द्या़ जेणेकरून एका पिकाला फटका बसल्यास अन्य पिकांचे उत्पादन हाती येईल़ ठिबक सिंचनाच्या वापरासाठीचा व्यापक आराखडा तयार करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले़
जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनेवर चर्चा
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यासाठी मंजूर २७९ कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीचा दुसरा हप्ता मिळाला असून त्याचे शेतकऱ्यांना सुनियोजितपणे वितरण केल्याची माहिती दिली़
मागेल त्याला शेततळे या योजनेत राज्यात सर्वात अधिक प्रतिसाद जिल्ह्यात मिळाल्याचे सांगताना पाच हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली़
जलयुक्त शिवार अभियानात चार हजार विहिरींचे पुनर्भरण झाले़ १३० जलपुनर्भरण स्तंभांच्या कामांना मंजुरी तसेच लोकसहभागातून गाळ उपशाच्या कामाने गती घेतली आहे़
स्थलांतर रोखण्यासाठी काम द्या
दुष्काळी परिस्थितीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्येकाच्या हाताला काम द्या़ याकरिता मनरेगामधून जास्तीत जास्त कामे हाती घ्यावेत, असे पालकमंत्री रावते यांनी सांगितले़