शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द

By Admin | Updated: July 23, 2014 00:29 IST2014-07-22T23:02:35+5:302014-07-23T00:29:34+5:30

बीड: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या सीईओ राजीव जवळेकर यांनी मंगळवारी एका आदेशाद्वारे रद्द केल्या आहेत.

Unlawful transfer of teachers | शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द

शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द

बीड: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या सीईओ राजीव जवळेकर यांनी मंगळवारी एका आदेशाद्वारे रद्द केल्या आहेत. त्यामुळे नियम डावलून बदल्या झालेल्या शिक्षकांसह बदल्यात सहभागी अधिकाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
ग्रामविकास विभागाने २१ जून २०१४ रोजी शिक्षक संवर्गातील वर्ग-३, वर्ग-४ च्या बदल्यांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने समुपदेशनानुसार बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची यादीही तयार केली. मात्र त्यानंतर या यादीतील शिक्षकांची संचिका तयार करून बदली आदेश रीतसर सामान्य प्रशासन विभागाकडून सीईओ राजीव जवळेकर यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणे अपेक्षित होते. परंतु माध्यमिक शिक्षकांचे बदली आदेश सामान्य प्रशासन विभाग, सीईओ यांच्या मार्फत न जाता परस्पर दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. भारती यांनी ही बाब सीईओ राजीव जवळेकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंगळवारी सीईओ जवळेकर यांनी एका आदेशाद्वारे नियम डावलून झालेल्या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. या संदर्भात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्र पाठविण्यात आले असून परस्पर आदेशाद्वारे बदली होऊन आलेल्या शिक्षकांना रूजू करून घेऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे आर.आर. भारती म्हणाले, माध्यमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बदल्या रद्द कराव्या लागल्या. या संदर्भात कारवाईची दिशा सीईओच ठरवितील. मात्र सामान्य प्रशासन विभागासमोर बदल्यांचे आदेश जायला हवे होते. नियमबाह्य कामांना थारा दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
३५ शिक्षकांचे काय होणार ?
माध्यमिक विभागात ३५ शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळेकर यांनी बदली आदेश रद्द केल्यामुळे आता या ३५ शिक्षकांचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे बदल्यांचे हे आदेश तत्कालिन शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांच्या स्वाक्षरीने दिलेले आहेत. देवगुडे हे आता निवृत्त झाले आहेत. यामुळे नियमबाह्य बदल्या करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे देखील गुलदस्त्यात आहे.

Web Title: Unlawful transfer of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.