छत्रपती संभाजीनगर : पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत प्रभाकर राठोड (रा. परळी, बीड ह. मु. पनवेल) यांच्यासह विशाल राठोड, राहुल (रा. उदगीर) यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या ३९ वर्षीय पीडितेवर अज्ञातांनी हल्ला करत मारहाण केली. गुरुवारी रात्री ८ वाजता संग्रामनगर उड्डाणपुलावर ही घटना घडली.
२८ जुलै रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला गुरुवारी सायंकाळी मैत्रिणीकडे जात होती. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर अचानक त्यांची चारचाकी अज्ञातांनी अडवली. कारमधून तिघांनी उतरत एकाने पीडितेची मान धरून पाठीत मारहाण केली. दुसऱ्याने हातातील धारदार वस्तूने उजव्या हातावर वार केला.
हल्लेखोरांनी महिलेला शिवीगाळ करत, ‘तू भारत प्रभाकर राठोड आणि विशाल प्रभाकर राठोड, राहुल अंबेसंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू नको’, असे बजावले. तो गुन्हा मागे घेतला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. नागरिक जमा होत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. महिलेने तत्काळ सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यामागे एका मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप महिलेने केला आहे.