विद्यापीठातील प्राध्यापक ‘अलर्ट’
By Admin | Updated: August 26, 2014 01:52 IST2014-08-26T01:05:39+5:302014-08-26T01:52:07+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालेला नॅकचा ‘अ’ दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सर्वच विभागांत अध्ययन, अध्यापन,

विद्यापीठातील प्राध्यापक ‘अलर्ट’
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालेला नॅकचा ‘अ’ दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सर्वच विभागांत अध्ययन, अध्यापन, संशोधनाचे काम व्यवस्थित सुरू आहे का, याची चाचपणी करण्यासाठी आजपासून कुलगुरू व ‘बीसीयूडी’ संचालकांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांना अचानक भेटी देण्यास सुरुवात केली. यामुळे विभागप्रमुख व प्राध्यापक ‘अलर्ट झाले आहेत.
दरम्यान, कुलगुरू कधी येतील याचा नेम नाही, या भीतीपोटी सर्वच विभागांमध्ये प्राध्यापक हे सोमवारी दिवसभर रेंगाळताना दिसून आले. विभागांमध्ये किती प्राध्यापक दिवसभर अध्यापनाचे काम करतात. किती जणाचे संशोधनाचे कार्य सुरू आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आदींसह अन्य विभागांतील प्रयोगशाळांची स्थिती काय आहे.
किती प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. किती प्रयोगशाळा कमकुवत आहेत. तेथील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आहेत. विभागांच्या जमेच्या बाजू व कमकवुत बाजूंची नोंद घेण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व ‘बीसीयूडी’चे संचालक कारभारी काळे या दोघांनी आजपासून गुरुवारपर्यंत रोज विभागांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व ‘बीसीयूडी’ चे संचालक कारभारी काळे या दोघांनी भेट देऊन तेथील प्राध्यापकांसोबत चर्चा केली. दोन्ही विभागांतील उणिवाही जाणून घेतल्या. कोणत्या विभागाला कोणत्या वेळी भेट देणार, याचे वेळापत्रक गोपनीय ठेवण्यात आल्यामुळे विभागातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी बसून राहणे पसंत केल्याची चर्चा आज दिवसभर विद्यापीठ परिसरात ऐकावयास मिळाली.