विद्यापीठ जागतिक दर्जाचे करण्याचे स्वप्न
By Admin | Updated: June 5, 2014 01:09 IST2014-06-05T01:04:29+5:302014-06-05T01:09:49+5:30
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणार्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे हे मी माझे भाग्य समजतो.
विद्यापीठ जागतिक दर्जाचे करण्याचे स्वप्न
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणार्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे हे मी माझे भाग्य समजतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला देशपातळीवरच नव्हे, तर जागतिक दर्जाचे करण्याचे स्वप्न घेऊन मी येथे आलो आहे, असा निर्धार नवनियुक्त कुलगुरू डॉ. बा.ए. चोपडे यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर येथे व्यक्त केला. प्रभारी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी डॉ. चोपडे यांच्या हाती राजदंड सोपवून त्यांना पदभारही सोपविला. त्यानंतर डॉ. चोपडे म्हणाले की, या विद्यापीठासह एक केंद्रीय विद्यापीठ व एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रस्ताव मला होता; परंतु मी डॉ. बा.आं.म. विद्यापीठाची निवड केली, ते केवळ एक स्वप्न उराशी बाळगून. देशातील ७०० हून अधिक विद्यापीठांपैकी केवळ ६५ विद्यापीठांना नॅकने ए दर्जा दिला आहे व त्यात या विद्यापीठाचा समावेश आहे, याचा मला अभिमान वाटतो. पदवीसोबतच संशोधन सुरू व्हावे पदवी प्राप्त केल्यानंतरच म्हणजे जरा विलंबानेच आपल्याकडे संशोधन सुरू होते, असे सांगून ते म्हणाले की, अमेरिका, युरोप व अन्य आधुनिक देशांची ताकद पदवीपूर्व संशोधनात आहे. बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रविष्ट होताच त्यांना संशोधनाची संधी मिळते. त्याच धर्तीवर या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणार्या महाविद्यालयांतून संशोधन प्रक्रियेला गती देण्याचा माझा विचार आहे. विद्यापीठाचे मूळ काम जनताभिमुख संशोधन करणे व शोध लावणे आहे, यावर जोर देत कुलगुरू म्हणाले की संशोधन, विकास व परिवर्तन ही विद्यापीठाच्या कामकाजाची त्रिसूत्री आपण ठेवणार आहोत. संशोधनासाठी पुढील २५ वर्षांचे नियोजन आपण करूया. या विद्यापीठात सर्व चांगलेच घडते आहे; परंतु त्याला फक्त दिशा देण्याची गरज आहे. जागतिक पातळीवरील शैक्षणिक स्पर्धा आपणास करावयाची असून, २०१६ पासून राबविल्या जाणार्या इंटरनॅशनल रँकिंगसाठी पहिली नोंदणी आपल्या विद्यापीठाची होईल, असे प्रयत्न आपण करूयात. त्यासाठी देशातील व जगातील चांगल्या संस्था, विद्यापीठांशी सामंजस्य करार करून दृढ संबंध प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांचे एक्स्चेंज कार्यक्रम राबविण्यावर आपला भर राहील. हे सर्व करण्यासाठी विद्यापीठाला निधीची मोठी आवश्यकता आहे; परंतु संशोधनासाठी आता शासनाकडून भरपूर निधी मिळतो, फक्त चांगले प्रस्ताव त्यांच्याकडे जायला हवेत, असे सांगून डॉ. चोपडे म्हणाले की, अधिकाधिक निधी आणून संशोधनासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने घेण्यात आला. यावेळी विद्यापीठातील शिक्षक व कर्मचार्यांसमोरही कुलगुरूंनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना थेट उत्तरे दिली. महाविद्यालयांना नॅक आवश्यक करणार संस्थाचालकांकडून येणार्या राजकीय दबाबाबद्दल विचारता ते म्हणाले की, हा फक्त याच विद्यापीठाचा प्रश्न नाही. देशभरातील विद्यापीठांना या प्रकाराचा सामना करावा लागतो; परंतु विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक तेथे कुलगुरूंचे विशेषाधिकार वापरण्यास आपण मागे-पुढे पाहणार नाही. सर्व महाविद्यालयांना नॅक मानांकन करणे आवश्यक केले जाईल, महाविद्यालये व विद्यापीठात सुसंवाद वाढविला जाईल, जालन्यातील मॉडेल कॉलेजला खरोखर मॉडेल केले जाईल, कॉर्पोरेट जगतासाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार त्यांच्या कॉर्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ, अशा उद्योगजगताशी संपर्क साधून त्यांना विद्यापीठात आणण्याचा प्रयत्न करील. कुलगुरू डॉ. चोपडे यांचा अल्प परिचय डॉ. चोपडे तीस वर्षांपासून अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पदव्युतर पदवी (एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी) त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली. इंग्लंडच्या नॉटिंगहॅम विद्यापीठातून पीएच.डी. व अमेरिकेतील शिकागोच्या इलिनॉस विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरल रिसर्च त्यांनी केले. बॅक्टेरियल जेनेटिक्स, मॉलेक्युलर बायोलॉजी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स इंजिनिअरिंग हे त्यांचे अभ्यास व संशोधनाचे विषय आहेत. ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून, त्यांच्या नावावर दोन पेटंटही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० हून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. पुणे विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख तसेच बायोटेक्नॉलॉजी व बायो-इन्फॉर्मेटिक्स विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. कुलगुरूंच्या दालनात डॉ. विद्यासागर यांनी डॉ. चोपडे यांना मानदंड व विद्यापीठाची सूत्रे सोपविली. यावेळी कुलसचिव डॉ. धनराज माने, सहसंचालक डॉ. मोहम्मद फय्याज, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. गीता पाटील, डॉ. गणेश शेटकर, अधिष्ठाता डॉ. विलास खंदारे, डॉ.उल्हास शिंदे, डॉ. एस. पी. झांबरे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. अरुण खरात, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. कुलगुरूपदाची सुत्रे स्विकारली डॉ. बी.ए. चोपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे १५ वे कुलगुरू म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडून बुधवारी सूत्रे स्वीकारली. कुलगुरू (पूर्णवेळ) म्हणून डॉ. चोपडे यांची पाच वर्षांसाठी कुलपती तथा राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी निवड जाहीर केली होती. डॉ. चोपडे हे बुधवारी सकाळी विद्यापीठात दाखल झाले. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. यावेळी कुलगुरूंच्या पत्नी नलिनी चोपडे याही उपस्थित होत्या.