विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:51 IST2025-03-26T11:51:55+5:302025-03-26T11:51:55+5:30
अंतिम निवड यादी १६ एप्रिल रोजी जाहीर होणार

विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘पेट’ अंतर्गत प्रवेशासाठीची प्राथमिक गुणवत्ता यादी (प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट) मंगळवारी जाहीर करण्यात आली. संशोधकांची अंतिम निवड यादी येत्या १६ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली.
विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. विजय फुलारी यांनी दोन वर्षांपासून रखडलेली पीएच. डी. प्रवेशासाठी परीक्षा (पेट) घेतली. त्यासाठी १ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान ‘समर्थ पोर्टल’द्वारे ऑनलाइन नोंदणी केली. ३ ऑक्टोबर रोजी ४४ विषयांसाठी पेट घेतली. चार जिल्ह्यांतील ११ केंद्रावर ११ हजार ४६४ विद्यार्थ्यांनी पेट दिली. १६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला. त्यानंतर ४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान संशोधन व अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) विषयनिहाय बैठका घेऊन सादरीकरण घेण्यात आले. सादरीकरणानंतर त्याची प्राथमिक गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आरआरसीसमोर सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच सेट, नेट, एम.फिल. प्राप्त व ‘पेट’मधून सूट मिळालेले विद्यार्थीही समाविष्ट आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासह अंतिम यादी १६ एप्रिल रोजी विषयनिहाय घोषित होणार आहे.
४४ विषयांत होणार प्रवेश
एकूण ४४ विषयांसाठी प्रवेश होणार आहेत. त्यामध्ये चार शाखांचा समावेश आहे. ४४ विषयांसाठी एकूण ४९७ संशोधकांकडे सद्य:स्थितीत १ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. ही संपूर्ण प्रवेशपूर्व प्रक्रिया ‘ऑनलाइन’ पद्धतीने राबविण्यात येत आहे.
आक्षेपांसाठी दहा दिवस
जाहीर यादीसंदर्भात काही आक्षेप असतील तर ५ एप्रिलपर्यंत संकेतस्थळावर दिलेल्या फॉर्मेटमध्ये संबंधित अधिष्ठातांच्या कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. विजय मोरे यांनी कळविले आहे.
२ हजार १६४ जणांची यादी
चार विद्या शाखांतील विषयांसाठी प्राथमिक यादी घोषित केली आहे. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखांतील १८ विषयांतील ६८३ विद्यार्थी, मानव्यविद्या शाखेत १३ विषयांत ९७३, आंतरविद्याशाखेत ६ विषयांत २४० आणि वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतील ३ विषयांसाठी २६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.