१ लाख ९० हजार विद्यार्थ्यांना गणवेश

By Admin | Updated: June 12, 2014 00:21 IST2014-06-12T00:19:34+5:302014-06-12T00:21:38+5:30

ृगणवेशावर होणार ७ कोटी ५० लाख ८२ हजार रूपये खर्च

Unite to 1.90 lakh students | १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांना गणवेश

१ लाख ९० हजार विद्यार्थ्यांना गणवेश

अनुराग पोवळे, नांदेड
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीत शिकत असलेल्या १ लाख ९० हजार ८०२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळणार आहे़ हा गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत़ गणवेशासाठी ७ कोटी ५० लाख ८२ हजार रूपये तालुकास्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ली ते आठवीत शिकत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीचे मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांसाठी शासनाने शालेय गणवेश योजना सुरू केली आहे़ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केला जातो़ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे माप घेण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १४ फेब्रुवारी २०१४ रोजीच दिल्या होत्या़ शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप होणे आवश्यक आहे़ तसेच शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या निकषपात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आत गणवेशाचे वाटप होणे आवश्यक आहे़
जिल्ह्यात गणवेश योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व मुलींची संख्या १ लाख २५ हजार २०३ आहे़ तर अनुसूचित जातींच्या मुलांची संख्या २७ हजार १२४, अनुसूचित जमातीच्या मुलांची संख्या १३ हजार ३१२ आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांची संख्या २५ हजार १६३ इतकी आहे़ शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे निर्देश असले तरी १५ आॅगस्टपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात नाही असे चित्र दरवर्षीच पहावयास मिळत आहे़ याबाबत संबंधितांवर कोणतीही कारवाई जिल्हा परिषदेने केली नाही़ संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांकडे गणवेश निधी वर्ग करण्यात येत आहे़
ज्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी गणवेश वाटप होणार नाही त्यासंदर्भात संबंधितांवर कारवाईचा इशारा यावर्षीही दिला आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष आणि शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेवून गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ तशी कोणतीही बैठक जिल्ह्यात तरी झाली नाही़
शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळणार काय ?
या योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक २० हजार ३४७ संख्या ही किनवट तालुक्यात आहे़ त्याखालोखाल हदगाव तालुक्यात २० हजार ८४, मुखेड - १७ हजार ८४५, लोहा - १५ हजार ५३०, कंधार - १२ हजार ८५०, अर्धापूर - ११ हजार २०१, हिमायतनगर - १० हजार ७६९, नायगाव - १० हजार ३६७, बिलोली - १० हजार ८१, भोकर - ९ हजार ९७१, नांदेड - ९ हजार ६८०, मुदखेड - ७ हजार ८५८, उमरी - ७ हजार ४४०, माहूर - ६ हजार ८६६ विद्यार्थी आणि धर्माबाद तालुक्यात ५ हजार ६६५ विद्यार्थी आहेत़

Web Title: Unite to 1.90 lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.