अखंडित वीज अन् आर्थिक बचत; छत्रपती संभाजीनगरात सौरऊर्जेच्या १० हजार जोडण्या
By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:36 IST2023-12-28T18:35:15+5:302023-12-28T18:36:06+5:30
वीज समस्येवर विविध वसाहती व उद्योजकांकडून मात

अखंडित वीज अन् आर्थिक बचत; छत्रपती संभाजीनगरात सौरऊर्जेच्या १० हजार जोडण्या
छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी विविध कॉलन्या व कारखानदारांनी सौरऊर्जा पॅनल बसवून वीज संकटावर मात केली. शहरात दोन वर्षांत दहा हजार कनेक्शनकडे वाटचाल सुरू आहे.
वीजपुरवठा सुधारण्यासाठी महावितरण विभागाने कात टाकली असून, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यावर किंवा ट्रान्सफाॅर्मर बिघाड देखील तत्काळ बदलून देणे किंवा दुरुस्तीवर भर दिला जात आहे. नवीन प्रीपेड मीटर देखील आणण्याची तयारी झालेली आहे.
सौर पॅनल बसविण्यासाठी मिळणाऱ्या सबसिडीचाही बहुतांश नागरिकांना फायदा झाला असून, वीज वापरातही मोठी सवलत मिळत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी वीज नसल्याने कामे आता खोळंबणार नाहीत, ही धारणा आता बहुतांश ग्राहकांत बळावत आहे. मावळत्या वर्षात वीज चोरीवर कारवाया देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या असून, त्यातून महावितरणने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे.
नागरिक बनताहेत सजग
वीज खंडित झाल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता, गतवर्षी ४३१८ तर यंदाच्या वर्षी ५६४१ सौरऊर्जा जोडण्या शहरात केल्या आहेत.
अखंडित वीज अन् आर्थिक बचत
गतवर्षीच्या तुलनेत १३२३ जोडण्यांची वाढ आहे. येणाऱ्या वर्षात ती संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांची सौरऊर्जेची मागणी वाढलेली आहे. त्यातून अखंडित वीज आणि आर्थिक बचतीचा लाभ जनतेला सातत्याने मिळणार आहे. विजेची बचत बिलावरून लक्षात येते.
-शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण