अशिक्षितही लढवू शकतो पदवीधरची निवडणूक
By Admin | Updated: June 2, 2014 01:33 IST2014-06-02T01:13:58+5:302014-06-02T01:33:17+5:30
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार पदवीधरच असावा, असा सर्वांचा समज आहे.

अशिक्षितही लढवू शकतो पदवीधरची निवडणूक
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार पदवीधरच असावा, असा सर्वांचा समज आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीसाठी शिक्षणाची अट नाही. त्यामुळे अशिक्षित व्यक्तीही ही निवडणूक लढवू शकते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात २० जून रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २४ जून रोजी होणार आहे. पदवीधर मतदारांचे नेतृत्व करणारा किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार हा पदवीधरच असावा, अशी अट असावी, असा सर्वांचा समज आहे; परंतु निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी अशी कोणतीही अट घातलेली नाही. केवळ उमेदवाराचे नाव राज्यातील कोणत्या तरी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असले पाहिजे, अशी एवढीच अट यासाठी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा सूचक असणे आवश्यक आहे. या सूचकांची नावे मात्र पदवीधर मतदारसंघाच्या यादीत असणे गरजेचे आहे. तसे असेल तरच अर्ज वैध ठरणार आहे. म्हणजेच उमेदवारासाठी शिक्षणाची अट नाही; परंतु त्यांच्या सूचकांसाठी मात्र आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पदवीधरच्या यादीत असण्याची अट नाही. त्याचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असले तरी तो ही निवडणूक लढवू शकतो. उमेदवाराच्या सूचकांचे नाव मात्र पदवीधर यादीमध्ये असणे आवश्यक आहे.