छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुन्या शहरात नळाला पाणी येत नाही, म्हणून अनधिकृत नळ जोडणी घेण्याचा सपाटा काही नागरिकांनी लावला. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी रात्री ७:३० वाजात मुजीब कॉलनी येथे मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर एक प्लंबर अनधिकृत नळ कनेक्शन देत होता. त्याच्यावर मनपाच्या पथकाने गुन्हा नोंदविला, पण तो पळून गेला.
मुजीब कॉलनी भागात ३०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर एक प्लंबर अनधिकृत नळ कनेक्शन नागरिकांना देत असल्याची माहिती थेट मनपा प्रशासकांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री पथक दाखल झाले. शेख सत्तार (रा. चिश्तिया कॉलनी) हा अनधिकृत प्लंबर नागरिकांना दोन अर्ध्या इंचांचे कनेक्शन देत होता. हे कनेक्शन कोणत्या नागरिकांना तो देतोय, हे सांगितले नाही. गर्दीचा फायदा घेत प्लंबरने घटनास्थळावरून पळ काढला.
या जलवाहिनीवर आणखी काही अनधिकृत नळ असल्याचे निदर्शनास आले. मनपाच्या पथकाने ५० फूट पाइप जप्त केला. प्लंबर सत्तार याच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात कनिष्ठ अभियंता आनंद राजपूत यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सत्तार याने अनेक ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन दिल्याच्या तक्रारी मनपाकडे येत होत्या. मात्र, तो रंगेहाथ सापडत नव्हता.