प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैैध वाहतूक !
By Admin | Updated: August 1, 2014 00:28 IST2014-08-01T00:11:57+5:302014-08-01T00:28:41+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे.
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैैध वाहतूक !
उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे. असे असतानाही अशा वाहनांवर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. या अवैध वाहतुकीने शेकडो लोकांचा बळी गेला आहे. उस्मानाबादसोबतच वाशी, भूम, कळंब, लोहारा, उमरगा, परंडा, तुळजापूर आदी तालुक्यांमध्ये हेच चित्र दिसते. या वाहनधारकांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न सदरील विदारक स्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना पडला आहे.
उस्मानाबाद शहरातून बार्शीनाका, बसस्थानक परिसर, सांजारोड , आदी ठिकाणाहून अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतुकीने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असला तरी प्रवाशी गावाला जाण्यासाठी एसटी ने जाता खाजगी वाहनांचा आधार घेत आहे. उस्मानाबाद शहरात सकाळी बसस्थानक समोर अवैध वाहतुकीचे काळीपिवळी, अॉटो थांबत असतात. हे वाहन चालक प्रवाशांना तुम्हाला कुठे जायचे सांगा आमची गाडी त्याच गावाला चाली असे म्हणुन सरास अवैध प्रवासी वाहतूक करीत असतात. या सर्व घटना वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोर होत असताना यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही हे विशेष. प्रवासी एसटीला जाणे पसंत करत नाहीत, कारण खाजगी वाहनापेक्षा एसटीचे तिकीट जास्त असल्याने ते प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेत असतात. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना गावाकडे जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, येडशी, तेर, बेंबळी इ. भागात सरास अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध वाहतुकी मध्ये प्रवाशा बरोबर सिलेंडर , पेट्रोल व डिझेल या पदार्थाची अवैध वाहतुकी मधून घेऊन जात असल्याने स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही महिन्यात जिल्ह्यात मोठया प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी अवैध वाहतूक मात्र कमी झालेली नाही.
बसच्या फेऱ्या कमी
अवैध वाहतूक करणारे वाहनाचालक पोलिस प्रशासनला चिरीमिरी देत असल्याने सरास अवैध वाहतूक सुरु असल्याचे प्रवासी सांगतात. या अवैध वाहतुकीने काही गावातील बसच्या फेऱ्या ही कमी झाल्या आहेत.
त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावी जाण्यासाठी अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचे प्रवासी सांगतात.
राजकीय दबाव
अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस किंवा आरटीओच्या पथकाने कारवाई केली तर राजकीय नेत्यांचे फोन येत असतात. संबधित वाहन सोडून द्या व त्याला दंड करु नका असे फोन येत असतात. त्यामुळे पोलिसांना अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकास सोडून द्यावे लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
३५९ वाहनांवर कारवाईचा बडगा
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या ३५९ वाहनावर आरटीओ कारवाई केली असून ५६ वाहनांचे रजिस्टे्रशन निलंबित केले आहे. २८ वाहनचालकांचे ड्रायव्हीग लायसन निलंबित केले. तसेच टॅक्स व दंड मिळून ३ लाख ७४ हजार ५२२ रुपये वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.