निराधार अनुदान वाटप; बँकेसोबतचा करार संपला
By Admin | Updated: May 3, 2016 01:08 IST2016-05-03T00:46:00+5:302016-05-03T01:08:50+5:30
औरंगाबाद : शहरातील निराधार लाभार्थ्यांच्या अनुदान वाटपासाठी दिलासा प्रकल्पांतर्गत बँक आॅफ इंडियासोबत करण्यात आलेला करार संपला आहे.

निराधार अनुदान वाटप; बँकेसोबतचा करार संपला
औरंगाबाद : शहरातील निराधार लाभार्थ्यांच्या अनुदान वाटपासाठी दिलासा प्रकल्पांतर्गत बँक आॅफ इंडियासोबत करण्यात आलेला करार संपला आहे. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार करार करण्यासाठी पाठपुरावा करूनही बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने १३ हजार निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जुन्या पद्धतीने बँक खात्यावर जमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
निराधारांसाठी संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावणबाळ या योजना राबविल्या जातात. सध्या १३ हजार २५० निराधार लाभार्थी असून, त्यापैकी सुमारे ४ हजार संजय गांधी योजनेचे आणि ७ हजार श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत. जिल्हा प्रशासनाने २०११-१२ या वर्षात निराधारांसाठी दिलासा प्रकल्प राबविला. लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत चकरा माराव्या लागू नयेत, त्यांना घराजवळ अनुदान मिळावे, यासाठी बँक आॅफ इंडियासोबत करार करण्यात आला.
लाभार्थ्यांचे आॅनलाईन खाते उघडण्यात आले. आधार कार्डाशी बँक खाते संलग्न करून बायोमेट्रिकच्या पद्धतीने अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली. बँक आॅफ इंडियाने शहरात १४ ठिकाणी फ्रँचायझी दिल्या. या फँ्रचायझीमार्फत लाभार्थ्यांना अनुदान मिळत होते. परंतु बँकेसोबत असलेला करार संपला आहे. हा करार पुढे चालू ठेवण्यासाठी प्रशासनाकडून बँकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अधिकारी हैराण झाले आहेत.