कार झाडाला धडकून दोन तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:31 IST2019-01-31T19:31:05+5:302019-01-31T19:31:12+5:30
शहराकडून वाळूज एमआयडीसीत येत असताना श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार झाडाला धडकून दोन तरुण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साऊथ सिटीजवळ घडली.

कार झाडाला धडकून दोन तरुण जखमी
वाळूज महानगर : शहराकडून वाळूज एमआयडीसीत येत असताना श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार झाडाला धडकून दोन तरुण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साऊथ सिटीजवळ घडली.
योगेश विश्वासराव पोफळे (२०, रा.म्हाडा कॉलनी, सिडको वाळूज महानगर) व त्याचा मित्र शुभम रमेश पवार (२४, रा. रांजणगाव शेणपुंजी) हे बुधवारी रात्री कारने (एमएच-२० ईई-०५४४) शहरात मित्राला भेटण्यासाठी गेले होते. भेट झाल्यानंतर दोघे वाळूज एमआयडीसीत घराकडे निघाले. औरंगाबाद- नगर महामार्गावरून भरधाव जात असताना मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास अचानक कुत्रा रस्त्यावर आला.
त्यामुळे चालक योगेश पोफळे याचे कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले. कार वडाच्या झाडावर जाऊन जोरात धडकली. यात योगेश व शुभम हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.