दोन वर्षीय बालकांनी पायी कापले एक किलोमीटरचे अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:52+5:302021-05-28T04:04:52+5:30
औरंगाबाद: घरापासून शासकीय दूध डेअरी चौकात चालत आलेल्या दोन वर्ष वयांची दोन मुले पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांच्या कुशीत ...

दोन वर्षीय बालकांनी पायी कापले एक किलोमीटरचे अंतर
औरंगाबाद: घरापासून शासकीय दूध डेअरी चौकात चालत आलेल्या दोन वर्ष वयांची दोन मुले पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांच्या कुशीत परतली. ही मुले बालाजी नगरातून काल्डाकॉर्नर रस्त्याने दूध डेअरी चौकापर्यंत तब्बल एक किलोमीटरचे अंतर पायी चालत गेली होती.
गुरुवारी सायंकाळी दोन चिमुकली हातात हात धरुन चालत चालत शासकीय दूध डेअरी चौकात येऊन थांबली. तेथे येऊन ते गोंधळले. चौकात घुटमळणाऱ्या या दोन चिमुरड्यावर पोलिसांची नजर पडली. त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रडायला लागली. ते घरातून हरवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि कर्मचारी यांनी त्या दोन्ही मुलांची छायाचित्रे विविध व्हॉट्सॲप ग्रूपवर प्रसारित केली आणि त्यांना ओळखणाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. काही वेळाने त्या दोन्ही बालकांचे पालक ठाण्यात आले. बालाजी नगर येथील रहिवासी ही चिमुकली परस्परांच्या घराशेजारीच राहतात. ते घराजवळ खेळत असताना पायी काल्डा कॉर्नरकडे आणि तेथून दूध डेअरी चौकाकडे गेल्याचे स्पष्ट झाले. या एक किमीच्या अंतरात त्यांना कुणीही रोखले नाही. लॉकडाऊनमुळे सुदैवाने रस्त्यावरील वाहतूक कमी आहे.