अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:10 IST2019-04-23T23:10:27+5:302019-04-23T23:10:35+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी खोजेवाडी फाट्यावर घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी खोजेवाडी फाट्यावर घडली. अपघातातील मृताची ओळख पटली नसून घटनास्थळी मिळून आलेली दुचाकी चोरीची असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी सकाळी गस्तीवर असताना खोजेवाडी फाट्यावर अनोळखी दुचाकीस्वार अपघातात जखमी असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली. पथक घटनास्थळी गेल्यानंतर खोजेवाडी फाट्यावर अनोळखी तरुण जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्याजवळच दुचाकी (एम.एच.१५, सी.जे.१६८९) पडलेली दिसली. अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
जखमी तरुणास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास ११ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी आढळून आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे उघडकीस आले. मृत तरुणाकडे ओळख पटविण्याचा कुठलाही पुरावा मिळून आला नसून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहे.