औरंगाबाद : शहरासह जालना, बीड आणि बुलडाणा जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या लोणार येथील चोरट्याला सिटी चौक पोलिसांनी अटक केली. विविध ठिकाणी चोरलेल्या तब्बल १२ मोटारसायकली या चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केल्या. आरोपीच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सय्यद हारुण सय्यद वसीम अली (वय ३०, रा. लोणार, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, शहरातून मोटारसायकली चोरी करून त्या परजिल्ह्यात विक्री करणारा चोरटा उध्दवराव पाटील हा चौकात आल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोहसिन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. डी. महांडुळे, कर्मचारी रोहिदास खैरनार, शेख गफ्फार, संदीप तायडे, संजय नंद, माजिद पटेल यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी सय्यद हारुण यास उध्दवराव पाटील चौकात पकडले. त्याच्याजवळील मोटारसायकलच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मोटारसायकल चोरीची असल्याचे मान्य केले. त्याला अटक करून पोलीस कोठडीत चौकशी केल्यावर, औरंगाबाद शहरातील सिटी चौक, क्रांती चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि औंढा नागनाथ, जालना, बुलडाणा आदी जिल्ह्यात मोटारसायकली चोरीचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. चोरलेल्या मोटारसायकली तो त्याचा साथीदार शेख वसीम शेख असलम (रा. लोणार) याला विक्री करायचा. तो त्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावायचा. आरोपींनी विविध ठिकाणी विक्री केलेल्या आणि लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
=======================
चौकट
पैसे संपले की मोटारसायकल चोरी
आरोपी हारुण हा बांधकाम मिस्त्री असल्याचे लोकांना दाखवित होता. प्रत्यक्षात मात्र तो वाहनचोरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे तपासात समोर आले. आरोपी हारुण हा मोटारसायकल चोरी करण्यासाठी औरंगाबादसह विविध ठिकाणी जात होता. चोरलेली दुचाकी विक्री करून घरखर्च भागवित होता. पैसे संपल्यानंतर तो पुन्हा वाहनचोरी करायचा.
=============
वडिलांच्या उपचारासाठी यायचा अन....
आरोपी सय्यद हारुण हा वडिलांच्या उपचारासाठी औरंगाबाद शहरातील रुग्णालयात यायचा. रुग्णालयाच्या आवारात मोठ्या संख्येने मोटारसायकली उभ्या असल्याचे पाहून त्याने पहिली दुचाकी चोरली. दीड ते दोन महिन्यात त्याने या दुचाकी चोरल्याचे पोलिसांनी सांगितले.