कोरोनाच्या काळातही दिली दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:17+5:302021-04-07T04:05:17+5:30
औरंगाबाद : सतत दोनवेळा पुढे ढकलण्यात आलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) अखेर मंगळवारी ६ एप्रिल रोजी ...

कोरोनाच्या काळातही दिली दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा
औरंगाबाद : सतत दोनवेळा पुढे ढकलण्यात आलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) अखेर मंगळवारी ६ एप्रिल रोजी शहरातील १० केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी प्रविष्ट २५२५ पैकी २०४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दोन सत्रांत दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. अगोदर १४ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात बदल करून २१ मार्चचा मुहूर्त काढण्यात आला; पण त्या दिवशी ‘एमपीएससी’ची राज्यसेवा पूर्व परीक्षा असल्यामुळे त्या दिवशी होणारी ही परीक्षा ६ एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला.
मंगळवारी १० परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारातच परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा ताप मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे, सॅनिटायझर तसेच परीक्षा कक्षात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवून सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले. सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत बौद्धिक क्षमता चाचणी, तर दुपारच्या सत्रात १.३० ते ३ वाजेदरम्यान शालेय क्षमता चाचणीचा पेपर झाला. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. या परीक्षेचे जिल्हा परीक्षक म्हणून विज्ञान पर्यवेक्षक वाय. एस. दाभाडे यांनी काम पाहिले. सहशिक्षक राजेंद्र शेळके यांनी त्यांना सहकार्य केले.