शहरात दोन हजार बेड शिल्लक, आयसीयू बेड कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:02+5:302021-04-07T04:05:02+5:30
औरंगाबाद : शहरात मार्चपासून दररोज किमान ८०० ते ९०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोविड केअर सेंटर आणि खासगी ...

शहरात दोन हजार बेड शिल्लक, आयसीयू बेड कमी
औरंगाबाद : शहरात मार्चपासून दररोज किमान ८०० ते ९०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. आयसीयू बेडची कमतरता आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये शहरात तब्बल ३१,५५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या संदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दररोज सरासरी साडेपाच हजार जणांची चाचणी केली जात आहे. तपासणीचे हे प्रमाण दहा हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात सध्या डीसीएच-१३, डीसीएसची-४० तर सीसीसी-१५ अशी व्यवस्था कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आहे. त्यात एकूण ७,४३३ बेड आहेत; तर सध्या ५,३७० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे सुमारे २ हजार बेड शिल्लक आहेत. २१२ व्हेंटिलेटर बेड असून, यातील २०५ बेडवर रुग्ण आहेत. ५६१ ऑक्सिजन बेड असून, यातील ५१५ बेडवर रुग्ण आहेत, असे त्यांनी नमूद केले.
------
पॉझिटिव्ह रेट कमी करणार
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह रेट २० टक्के असून, तो कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. रिकव्हरी रेट ६५ टक्के एवढा खाली आला आहे. चाचण्यांचा विचार केला असता एक दशलक्षामागे १ लाख २३ हजार २०३ एवढा आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
एंट्री पॉइंटस्वर १४ हजार नागरिकांची तपासणी
महापालिकेने २२ मार्चपासून शहराच्या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचणी सुरू केली आहे. शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर आतापर्यंत १४,५९८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात १५३५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. १५३५ पैकी २११ नागरिक महापालिका क्षेत्राच्या बाहेरचे होते.