औरंगाबाद : न झालेल्या अपघाताचे बोगस पंचनामे तयार करून विमा कंपनीकडून विमा दावे उचलणाऱ्या रॅकेट्समधील फरार दोन पोलीस हवालदारांना आर्थिक गुन्हेशाखेने शुक्रवारी अटक केली. याविषयी वेदांतनगर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा नोंद झाला होता, तेव्हापासून हे दोन्ही पोलीस हवालदार अटकेच्या भितीने पसार झाले होते.
रमेश धुपाजी नरवडे (बक्कल नंबर १०३८)आणि मुश्ताक सिकंदर शेख (बक्कल नंबर १२४)अशी अटकेतील पोलीस हवालदारांची नावे आहेत. या रॅकेटमधील डॉ. महेश मोहरीर ( रा. जवाहर कॉलनी), दलाल शेख लतीफ शेख अब्दुल ( रा. समता नगर), आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अब्दल रज्झाक अब्दुल रहीम(नेमणूक सिटीचौक पोलीस ठाणे) आणि या प्रकरणातील फिर्यादी एचडीएफसी इआरजीओचा कंपनीचा अधिकारी सतीश अवचार यांना पोलिसांनी अटक केली होती.
एचडीएफसी इआरजीओ, एसबीआय जनलर विमा कंपनी आणि फ्यूचर जनरली विमा कंपनीकडे सुमारे ६० बोगस विमा दावे दाखल करून आरोपींनी लाखो रुपयांची फसवणुक केली होती. याबाबतची तक्रार अवचारने वेदांनगर ठाण्यात नोंदविली होती. या आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा विमा कंपनीकडे बोगस विमा दावे दाखल करून फसवणुक करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले होते. या रॅकेटमध्ये डॉक्टर, दलाल, पोलीस आणि विमा कंपनीचा कर्मचारी यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते.
या गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेले पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश नरवडे आणि छावणी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मुश्ताक शेख यांनी न झालेल्या अपघाताचे अनेक बोगस पंचनामे केले होते. या रॅकेटचा पर्दाफाश होताच अटक टाळण्यासाठी फेब्रुवारी २०१७ पासून दोन्ही पोलीस कर्मचारी पसार झाले होते. तेव्हापासून ते पसार होते.