दोन जणांना आॅनलाईन गंडा
By Admin | Updated: June 20, 2016 00:56 IST2016-06-19T23:28:13+5:302016-06-20T00:56:41+5:30
औरंगाबाद : तोतया बँक अधिकाऱ्याने एटीएम कार्डचा क्रमांक विचारून माजी सैनिकाच्या बँक खात्यातून नेट बँकिंगच्या माध्यमातून ४६४९८ रुपयांना गंडवले.

दोन जणांना आॅनलाईन गंडा
औरंगाबाद : तोतया बँक अधिकाऱ्याने एटीएम कार्डचा क्रमांक विचारून माजी सैनिकाच्या बँक खात्यातून नेट बँकिंगच्या माध्यमातून ४६४९८ रुपयांना गंडवले. दुसऱ्या एका घटनेत दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ८५ हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील मांगेगाव येथील शरद वाघरूळकर हे माजी सैनिक आहेत. त्यांचे जुना मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. ११ जून रोजी दुपारी रविकुमार नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने शरद यांच्याकडून त्यांच्या एटीएम कार्डवरील १६ क्रमांकाची माहिती विचारली. त्यानंतर त्याने पुन्हा सात अंकाची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर त्याने शरद यांच्या खात्यातील ४६४९८ रुपये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून परस्पर काढून घेतले. शरद दोन दिवसांपूर्वी बँकेत गेले आणि त्यांनी पासबुकात नोंदी घेतल्या तेव्हा फसवणुकीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
दुबईतील नोकरीच्या आमिषाने फसवले....
लक्ष्मी कन्सल्टन्सीने दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीच्या रिक्त जागा भरायच्या असल्याची जाहिरात दिली होती. ही कंपनी दुबईतील मेरकाटो शॉपिंग मॉल येथे नोकरी आणि व्हिसाची पूर्ण सुविधा करून देणार होती. बीड येथील इरफान जफर बावजीर (२८) या सेल्समन तरुणाने नोकरीसाठी लक्ष्मी कन्सल्टन्सीच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी शहनाया नावाच्या प्रतिनिधीने फोन घेतला. आरोपीने इरफान यांना बनावट ई-मेल आयडी कळविला. या ई मेलवरून त्यांनी पत्रव्यवहार करण्याचे सांगितले.
शिवाय नोकरीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात रोख ८५ हजार रुपये भरण्याचे सांगितले. ही रक्कम भरल्यानंतरच तुम्हाला नोकरी मिळेल असे आमिष दाखविले. आरोपीवर विश्वास ठेवून इरफान यांनी १६ मे ते १८ जून या कालावधीत ही रक्कम आरोपीच्या खात्यात जमा केली. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ई-मेल बंद करून टाकला. आरोपीसोबत संपर्क होत नाही आणि त्यांनी आपली फसवणूक केल्याचे समजताच इरफान यांनी सिडको ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
पोलिसांनी आय.टी. अॅक्ट आणि फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती तपास करीत आहेत.
कोणालाही फोनवरून माहिती देऊ नका- पोलीस
कोणतीही बँक ग्राहकांस फोन करून बँक खात्याविषयी अथवा एटीएम कार्ड, क्रे डिट कार्डबाबत माहिती विचारत नाही. फोनवरून एटीएम कार्ड अथवा क्रेडिट कार्डची माहिती विचारणारे हे सायबर गुन्हेगार असतात.
केवळ फसवणूक करण्याच्या उद्देशानेच ते बँक ग्राहकांना फोन करून माहिती विचारतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला फोनवरून माहिती देऊ नका, असे आवाहन गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले. विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसविणारे लोकही जाहिराती देऊन बेरोजगारांना गंडवितात.