खुलताबाद(छत्रपती संभाजीनगर): पायी घरी जाणाऱ्या नंद्राबाद येथील दोघांना भरधाव कारने उडविल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावाजवळ सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात घडला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील छावणी आर्मीत सुभेदार पदावर कार्यरत असलेले मनोजकुमार मारूती काटकर हे आपल्या पत्नीसह खुलताबाद- वेरूळकडे कारने (क्रमांक २४ बीएच ५६६३) येत होते. तर, नंद्राबाद गावाजवळ तलत डीएड कॉलेजसमोर नंद्राबाद येथील ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव (वय ३४) आणि अशोक यादव घुसळे (वय ५५) हे शेतातून घराकडे पायी चालत होत होते.
यावेळी सुभेर मनोजकुमार काटकर यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे दोघांना उडवले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी कारने पळून जात होते, मात्र पोलिसांनी म्हैसमाळ रोडवर अपघातग्रस्त गाडीसह आरोपींना त्बाय्त घेतले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, बीट जमादार शेख जाकीर, सिध्दार्थ सदावर्ते यांनी भेट देवून पंचनामा करुन मयताचे मृतदेह खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सकाळी ११ वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहाचे पंचनामे करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
मयत ज्ञानेश्वर हा अविवाहित असून, अशोक घुसळे यांच्या पश्चात पत्नी, ९ मुली, मुलगा असा परिवार आहे. नंद्राबाद येथील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याने नंद्राबाद गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.