तिहेरी अपघातात दोघे ठार
By Admin | Updated: January 25, 2017 00:43 IST2017-01-25T00:42:01+5:302017-01-25T00:43:37+5:30
परंडा :भीषण तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़

तिहेरी अपघातात दोघे ठार
परंडा : एका दुचाकीला जोराची धडक देऊन दुचाकीस्वाराने टमटमला समोरून जोराची धडक दिली़ या भीषण तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़ हा अपघात मंगळवारी सायंकाळी परंडा- सोनारी राज्य मार्गावरील वीज कंपनीच्या उपकेंद्राजवळ घडला़
किराणा दुकानातील दिवसभरातील कामकाज आटोपून उमेश बाळासाहेब टमटमे (वय-२६) हे मंगळवारी सायंकाळी भोंजागावी वालवड येथील मेव्हणा संतोष जगताप (वय-३२) यांच्यासह दुचाकीवरून भोंजाकडे (ता. परंडा) दुचाकीवरून निघाला होता़ परंडा - सोनारी राज्यमार्गावरील २२० केव्ही केंद्राजवळील काही अंतरावर वाल्हा (ता. भूम) गावाकडे सुभाष कांबळे आपले सहकारी कुंडलीक चव्हाण यांच्यासह दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या उमेश टमटमे यांच्या दुचाकीने सुभाष कांबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेनतंर टमटमे यांची दुचाकी समोरून आलेल्या टमटमला समोरून धडकली. धडक इतकी भीषण होती की टमटमच्या समोरील काचाचा चक्काचूर झाला. या धडकेत उमेश टमटमे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संतोष जगताप यांच्या पायाला, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीचा चालक सुभाष कांबळे यांच्या गुडघ्याला, हाताला जबर मार लागला असून, पाठीमागे बसलेल्या कुंडलिक चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे़ गंभीर जखमी दोघांवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.