बस-टेम्पो अपघातात दोन ठार

By Admin | Updated: July 29, 2014 01:09 IST2014-07-29T00:23:09+5:302014-07-29T01:09:32+5:30

बालाजी सुरवसे , ढोकी बस-टेम्पोच्या भीषण अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले

Two killed in bus-tempo accident | बस-टेम्पो अपघातात दोन ठार

बस-टेम्पो अपघातात दोन ठार

बालाजी सुरवसे , ढोकी
बस-टेम्पोच्या भीषण अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून, १९ प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात सोमवारी सकाळी घोगरेवाडी (ता़उस्मानाबाद) शिवारात घडला असून, जखमींवर लातूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ मयतामध्ये एका विद्यार्थ्याचा समावेश आहे़
पोलिसांनी सांगितले की, बार्शी आगाराची बस (क्र. एम.एच. ०७ सी. ७३३३) सोमवारी सकाळी प्रवासी घेऊन लातूरकडे जात होती़ उस्मानाबाद तालुक्यातील पळसपनजीकच्या घोगरेवाडी शिवारातील मार्गावर या बसची लातूर येथून केळी घेऊन बार्शीकडे निघालेल्या टेम्पोशी (क्र. एम.एच. २२ एन. २१९९) समोरासमोर धडक झाली़ या भीषण अपघातात मुरूड येथील जनता विद्यालयात शिक्षणासाठी निघालेला आकाश धनंजय ढमे (वय १८, रा. कसबे तडवळे) या विद्यार्थ्यासह बांगरवाडी (ताक़ळंब) येथील दशरथ नामदेव बांगर (वय४३) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर बसचालक विकास अशोक काळे (वय ३५), श्रीकांत उपचंद नोहकरे (रा. कळंब, वय ३०), महेंद्र राजेंद्र साबळे (वय ४०, रा. नायगाव, ता. कळंब), सुदर्शन माणिकराव लोहार (वय ३५, रा. कळंब), सत्यभामा भारत चव्हाण (वय ५०, रा. कळंब), डॉ. राजेंद्र तात्याबा जाधवर (वय ६४, एम.आय.टी. कॉलेज लातूर), राम जाधव (वय २८, रा. इंजली ता. मुखेड), संगीता शिंदे (वय ४०, रा. उदगीर), सुलोचना पंडित (वय २०, रा. भाटशिरपुरा) हे गंभीर जखमी झाले़ गंभीर जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर पृथ्वीराज ठाकूर (वय ३०, रा. ढोकी), भारत चव्हाण (वय ६४, कळंब), शाम सूर्यवंशी (वय ३२ रा, उदगीर), गणपत राठोड (वय ३५, रा. येडशी), मिनाज शेख (वय २५ रा. रांजणी), प्रकाश शिंदे ( रा. देगलूर), हर्षद गवळी (वय १६, र. वांगी ता. भूम), रमाकांत कसबे (वय १९, रा.मुखेड), वाहक प्रकाश भुरके (वय ३४), व सादिक शेख ढोकी यांच्यावर ढोकी येथे प्रथमोपचार करून सोडण्यात आले़
चालकाचे प्रसंगावधान
अपघातानंतर काही क्षणातच अरूंद पुलाच्या कठड्यावर जाणारी बस चालकाने बाजूच्या शेतात रोडपासून जवळपास २०० फूट अंतरावर उसाच्या फडात नेऊन थांबविली. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अनेकांचा जीव बचावला़ अपघातग्रस्त शेतात जेथे जाऊन थांबली तेथे जवळच विद्युत पोल होता. पोलला धडक बसता-बसता काही फुटांवर गाडी थांबल्याने पुढील अनर्थ टळल्याची चर्चा अपघातस्थळी होती.
धोकादायक पूल
घोगरेवाडी शिवारातील अपघात झालेल्या लातूर महामार्गावरील अरूंद पूल हा धोकादायक बनला आहे़ वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे या पुलाची रूंदी वाढवून साईडपट्ट्या भरण्याची मागणी होत होती़ मात्र, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने दोघांना आपले प्राण गमवावे लागले़
तिघांची प्रकृती चिंताजनक
बसचालक विकास काळे यांच्यासह श्रीकांत लोकरे, सत्यभामा चव्हाण या तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर लातूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
कसबे तडवळा गावावर शोककळा
अपघातात ठार झालेल्या आकाश धनंजय ढमे याने दहावीच्या परीक्षेत ७६ टक्के गुण घेतले होते़ वडील दुसऱ्याच्या शेतात बटईने काम करीत असतानाही मुलाचे भविष्य चांगले घडावे, यासाठी मुरूड येथील जनता विद्यालयात त्यांनी मुलाला ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून दिला होता़ मात्र, सोमवारी सकाळी बसच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच तडवळा गावावर शोककळा पसरली़ त्याच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे़

Web Title: Two killed in bus-tempo accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.