नेवरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: May 17, 2014 01:05 IST2014-05-17T00:58:18+5:302014-05-17T01:05:06+5:30
हदगाव : तालुक्यातील नेवरी या गावात फलक लावल्याच्या कारणावरून दोन गटांत १५ मे च्या सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली़

नेवरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी
हदगाव : तालुक्यातील नेवरी या गावात फलक लावल्याच्या कारणावरून दोन गटांत १५ मे च्या सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली़ यात १२ जण जखमी झाले़ तर अनेक घरांची नासधूस झाली़ परस्परांविरूद्ध तक्रार दिल्याने मनाठा ठाण्यात २३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यांना उपचारासाठी हदगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले़ नेवरी येथे एका गटाने ३ मार्च रोजी हनुमान मंदिराच्या बाजूला व बौद्ध विहारासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे फलक लावले़ परंतु या फलकाला दुसर्या गटाने विरोध केला़ हे प्रकरण मनाठा ठाण्यात आल्याने दोन्ही गटांची समजूत काढून महसूल विभागाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली होती, परंतु आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने हे प्रकरण थांबले होते़ १४ मे रोजी बुद्ध जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांनी विहारासमोर पंचशील ध्वज लावून पंचशील बुद्धविहार असे फलक 'त्या' फलकाच्या बाजूला लावल्याने दोन गटांत वाद झाला़ या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले़ दुसरा गट १५ मे रोजी नांदेडला लग्नाला गेल्याचे निमित्त साधून एका गटाने उर्वरित ग्रामस्थांवर एकत्र जमून हल्ला केला़ दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली़ यात एका गटाचे आठ जण तर दुसर्या गटाचे चार जण गंभीर जखमी झाले़ त्यांना तत्काळ हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ १५ मे च्या रात्री गावात तणावपूर्ण शांतता होती़ पोलिस यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे़ फिर्यादी उत्तम विठ्ठल पडघणे (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून शिवराज शिंदे, पंडित शिंदे, भगवान शिंदे, प्रेमअशोक शिंदे, प्रकाश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सदानंद शिंदे, बापूराव कदम, दामोदर इंगळे, शिवराम शिंदे, विनोद शिंदे, बालाजी खिल्लारे व साहेबराव शिंदे व इतर रा़ नेवरी यांच्याविरूद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला़ तपास पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे करीत आहेत़ तर दुसर्या गटाकडील फिर्यादी संदीप शिंदे (वय २६, रा़ नेवरी) यांच्या फिर्यादीवरून उत्तम पडघणे, गौतम पडघणे, दिलीप पडघणे, विश्रांत पडघणे, धम्मपाल पडघणे, सिद्धार्थ इंगोले, पुंजाराम पडघणे, रमेश पडघणे, जयराम पडघणे व सुनील पडघणे व इतर रा़ नेवरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास बी़ ए़ कुकडे करीत आहेत़ सध्या गावात पोलिस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे़ (वार्ताहर)