काँग्रेसचे दोन गट, युतीच्या जागांचा घोळ कायम !
By Admin | Updated: December 28, 2015 00:17 IST2015-12-28T00:08:18+5:302015-12-28T00:17:24+5:30
वाशी : नगर पंचायत निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रवादीसोबत गेला आहे. शिवसेना-भाजपा युतीचा मात्र,

काँग्रेसचे दोन गट, युतीच्या जागांचा घोळ कायम !
वाशी : नगर पंचायत निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रवादीसोबत गेला आहे. शिवसेना-भाजपा युतीचा मात्र, जागेचा घोळ रविवारी सायंकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे युती राहणार की हे पक्ष स्वतंत्र लढणार हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे़
नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी ९३ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते़ छाननी प्रक्रियेत १५ अर्ज अवैध ठरले. तर ७८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा अंतीम दिनांक आहे़ काँग्रेसचे जि.प.सदस्य प्रशांत चेडे यांनी काँग्रेस पुरस्कृत स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे. तर काँग्रेसचे सुरेश कवडे यांच्या गटाने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. मात्र, प्रभाग सहा मध्ये राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत़ पक्षाने अॅड.सुर्यंकांत सांडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे पदधिकारी अर्ज मागे घेणार की बंडखोरी करणार ? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे़
शिवसेना- भाजपाने जुनी राजकीय युती कायम ठेवण्याच्या दृष्टीने आजवर हलचाली केल्या आहेत़ मात्र, या युतीचे १७ उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत ‘फायनल’ झाले नव्हते, त्यामुळे शिवसेना-भाजपा युती कायम राहणार की, हे पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात स्वतंत्र नशीब आजमावणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे़ दरम्यान, निवडणुकीत काँग्रेसचे १७, राष्ट्रवादी काँग्रेस व बंडखोर काँग्रेसचे १७, भाजपा-सेना आघाडीचे १७ असे ५१ व इतर ५ ते ६ अपक्ष उमेदवार उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ (वार्ताहर)