पोलीस असल्याची बतावणी करून व्यापा-याची अडवणूक करणारी दोन तोतया अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:20 IST2017-11-02T20:19:31+5:302017-11-02T20:20:08+5:30
महावीर चौकाकडून (बाबा पंप चौक) बसस्थानकाकडे पायी जाणा-या शेतक-याला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची अंगझडती घेण्याचा प्रयत्न करणा-या दोन तोतयांना जनतेच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले.

पोलीस असल्याची बतावणी करून व्यापा-याची अडवणूक करणारी दोन तोतया अटकेत
औरंगाबाद : महावीर चौकाकडून (बाबा पंप चौक) बसस्थानकाकडे पायी जाणा-या शेतक-याला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची अंगझडती घेण्याचा प्रयत्न करणा-या दोन तोतयांना जनतेच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई महावीर चौक ते बसस्थानक रोडवर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
रियाज अहमद कलीम अहेमद(३०,रा.आशानगर, मालेगाव, जि.नाशिक)आणि फैय्याज अहेमद कलमी अहेमद(३५,रा.सलीमनगर, मालेगाव,जि.नाशिक)अशी अटकेतील तोतया पोलिसांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार योगेश विनायक पायगव्हाण(रा. आळंद, ता. फुलंब्री) हे शेती आणि शेळ्या खरेदीविक्रीचा व्यवसाय करतात. २ नोव्हेंबर रोजी ते सकाळी छावणीच्या आठवडी बाजारात गेले. तेथे त्यांनी शेळ्यांचे दर पाहिले आणि तेथून ते रिक्षाने महावीर चौक मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे पायी जाऊ लागले. यावेळी आरोपींनी योगेशला गाठले आणि आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. तु मालकाचे पैसे घेऊन पळून जात असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे,असे म्हणाले. यावेळी एका जणाने त्यांचा हात पकडून त्यांना रस्त्याच्या कडेला घेऊन गेला तर दुसरा खिशात हात घालून झडती घेऊ लागला. यावेळी योगेश यांनी त्यांना तो शेतकरी असून शेळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगून त्यांना आधारकार्ड दाखविले. तेव्हा एक जण हात पकडून एकांतात नेऊ लागला.
यावेळी योगेश यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली असता तेथे असलेल्या लोकांमध्ये साध्या वेशातील काही पोलीस होते. पोलीस आणि नागरीक मदतीला तिकडे धावले तेव्हा त्यांनाही आरोपींनी त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी योगेश यांना ओळखपत्र दाखवून ते खरे पोलीस असल्याचे सांगून तोतयांना पकडून रिक्षात बसविले आणि योगेश यांना घेऊन ते थेट क्रांतीचौक ठाण्यात आले. तेथे योगेश यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तोतयागिरी करणा-या दोन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी राजेश फिरंगे, अनिल इंगोले, सतीष जाधव, राम अरगडे, गणेश वाघ, विशाल पाटील यांनी आरोपींना रंगेहात पकडले.