आदिवासींसाठी अडीच कोटी मंजूर
By Admin | Updated: April 25, 2016 23:33 IST2016-04-25T23:29:40+5:302016-04-25T23:33:11+5:30
परभणी : जिल्हा आदिवासी उपयोजनेने तयार केलेल्या आगामी वर्षाच्या वार्षिक आराखड्यात २ कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली

आदिवासींसाठी अडीच कोटी मंजूर
परभणी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा आदिवासी उपयोजनेने तयार केलेल्या आगामी वर्षाच्या वार्षिक आराखड्यात २ कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमधून आदिवासी समाजबांधवांसाठी विकास योजना राबविल्या जाणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विविध भागांच्या विकासासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार केला जातो. यानुसार जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत २०१६-१७ या वर्षाचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी समाजासाठी योजना राबविल्या जातात.
२०१६-१७ या वर्षासाठी पीक संवर्धन, पशुसंवर्धन, एकात्मिक ग्रामविकास, मागासवर्गीयांचे कल्याण, कामगार कल्याण अशा उपशिर्षनिहाय योजनांचे नियोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या तुलनेने कमी असून या प्रकल्पांतर्गत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी वेगवेगळ्या घटकान्वये उपयोजना राबविल्या जात आहेत.
आगामी वर्षासाठी केलेल्या नियोजनानुसार आदिवासी शेतकरी कुुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी अर्थ सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी ५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर दुभत्या जनावरांच्या गटांच्या वाटपासाठी ३ लाख २० हजार, शेळ्या गटाच्या वाटपासाठी २ लाख ८० हजार, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जमातीतील उमेदवारांच्या निर्वाह भत्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी विकसित करण्याच्या उद्देशाने ५० हजार रुपये आणि शिकाऊ उमेदवारांसाठी निर्वाहभत्ता म्हणून ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बालकल्याण समितीअंतर्गतही आदिवासींच्या योजनांसाठी ३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. (प्रतिनिधी)
जिंतूर तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी
परभणी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात येणाऱ्या आदिवासी समाजाची संख्या इतर जिल्ह्याच्या तुुुलनेत अत्यल्प आहे. जिंतूर तालुक्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्याही अधिक आहे.
सोनपेठ, पाथरी तालुक्यातही तुरळक प्रमाणात लाभार्थी उपलब्ध आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत परभणी जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी योजना राबविल्या जातात.