फळबागा वाचविण्यासाठी सव्वातीन कोटी रुपये
By Admin | Updated: May 20, 2015 00:17 IST2015-05-19T23:59:52+5:302015-05-20T00:17:41+5:30
विष्णू वाकडे , रामनगर राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील

फळबागा वाचविण्यासाठी सव्वातीन कोटी रुपये
विष्णू वाकडे , रामनगर
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील तीन हजार २८३ लाभार्थी शेतकऱ्यांना २ हजार ५५ हेक्टर क्षेत्राच्या फळपिकासाठी तीन कोटी २८ लाखाचे विशेष पॅकेज अनुदानाचे धनादेश संबंधित बँकेस वितरित करण्यात आल्याचे कृषी विभागाचे एन.एन. नंदवंशी, बी.एन. जोशी (राष्ट्रीय फलोत्पादन) यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विपरित परिस्थितीने फळबागधारक शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यासाठी सदरील मदत जाहीर झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी करणे, बोर्डोपेस्ट लावणे, किडनाशक फवारणी करणे, आंतरमशागत करणे, सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे तसेच प्लॅस्टिक अच्छादन टाकणे अर्थात पुनरूज्जीवन/पर्णसंभार व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबीचा समावेश होता. सर्व बाबीसाठीचे मंजूर एकत्रित हेक्टरी अर्थसाह्य ५० टक्के प्रमाणे ३६ हजार रुपयांपर्यंत देण्यात आले. यानुसार जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, जिल्ह्यातील मोसंबी बागा वाचविण्यास मोठी मदत होणार असल्याचे बोलले जाते.
जालना, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, मंठा या सर्व तालुक्यातील कृषी सहायकामार्फत संबंधित लाभार्थ्यांची माहिती तालुका कृषी कार्यालयास देण्यात आली. उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत संबंधित लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम त्याच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वितरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही लाभार्थ्यांचे खातेक्रमांकामध्ये चुका झाल्याने संबंधितांना अर्थसाह्य घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याच्या बाबी समोर येत आहे.
लाभार्थी शेतकरी म्हणतात आम्ही तर बरोबर खातेक्रमांक दिला. त्यावर पुढे माहिती पाठविणारेही म्हणतात आम्ही जो नंबर लाभार्थ्यांनी दिला तोच टाकला. तरीही तांत्रिकदृष्ट्या काही उणिवा राहून जातात आणि याचा फटका संबंधित लाभार्थ्यांना बसतो. याचा प्रत्यय दुष्काळी अनुदान वाटपातून दिसून आला आहेच. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फळबागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठीचे अर्थसाह्य वितरणाचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल.
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी बँकेच्या आयएफ एससी कोड तसेच बँक खातेक्रमांक अचूक देणे गरजेचे आहे. याची काळजी घेतली जावी, असेही घाटगे यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या भीषण दुष्काळी परिस्थतीत पारा ४४ अंशाच्या वर चढला असताना विशेष पॅकेज मिळूनही फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावीच लागणार आहे. पाणीपातळी प्रचंड खोल गेल्याने पाण्याचे संकट समोर आहेच. शिवाय भारनियमन व्यतिरिक्त अनेक भागात कृषी पंपांची वीज गायब असते. चार-चार दिवस वीजपुरवठा राहत नाही. यामुळे काहींना पाणी उपलब्ध असूनही जीवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यात मोठा अडथळा निर्माण होतो. सुरळीत वीजपुरवठा होणे गरजेचे असल्याचे बहुतांश फळबागधारक शेतकऱ्यांनी सांगितले.