विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी तेवीस लाख वितरित
By Admin | Updated: June 24, 2014 00:25 IST2014-06-24T00:25:33+5:302014-06-24T00:25:33+5:30
कळंब : जिल्हा परिषद शाळेमधील सर्व मुलींना तसेच अनुसुचित जाती जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप केला जातो.

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी तेवीस लाख वितरित
कळंब : जिल्हा परिषद शाळेमधील सर्व मुलींना तसेच अनुसुचित जाती जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप केला जातो. तालुक्यातील १४३ शाळातील ११५१९ विद्यार्थ्यांसाठी २३ लाख रुपयाचा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने वितरित केला असून, बहुतांश शाळांत पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटपही करण्यात आले.
जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलींना तसेच अनुसुचित जाती, अनसुचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वाटपासाठी निधी देण्यात येतो. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रति विद्यार्थी २०० रुपयाप्रमाणे हा निधी तालुका गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्या-त्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. गणवेश वाटपासाठी कळंब तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १४१ व नगर परिषदेच्या दोन अशा एकूण १४३ शाळा पात्र आहेत. या शाळेतील १ ली ते ८ वी पर्यंतच्या ११ हजार ५१९ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानच्या या मोफत गणवेश वाटप योजनेचा लाभ मिळणार आहे.
बहुतांश निधी अखर्चित रकमेतील
तालुक्यातील ११ हजार ५१९ पात्र विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २०० रुपयाप्रमाणे २३ लाख ३ हजार ८०० रुपयाचा निधी नुकताच वितरित करण्यात आला आहे. संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत हा निधी वर्ग करण्यात आला असून, यातील बहुतांश निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अखर्चित रकमेतील असल्याचे समजते.
खाजगी शाळांना लाभ नाही
कळंब तालुक्यात जवळपास ३२ खाजगी अनुदानित, अशंत: अनुसुवित व कायम विना अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांना या योजनेतून मोफत गणवेशाचा लाभ मिळत नाही. वस्तुत: या शाळेत अनेक गरजू तसेच कष्टकरी वर्गातील व्यक्तीचे पाल्य शिक्षण घेत असतात. यामुळे सर्व शिक्षा अभियानमार्फत या शाळातील विद्यार्थ्यांनाही मोफत शालेय गणवेश वाटप योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी खाजगी शााळांतील मुख्याध्यापकांच्या वतीने सुरेश टेकाळे यांनी केली आहे.