पर्यायी पूल वाहतुकीस बंद
By Admin | Updated: June 19, 2017 00:10 IST2017-06-19T00:07:03+5:302017-06-19T00:10:38+5:30
बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल खचला असतानाही त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु होती.

पर्यायी पूल वाहतुकीस बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल खचला असतानाही त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु होती. ही वाहतूक धोकादायक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत हा पूल वाहतुकीसाठी रविवारी दुपारपासून बंद केला आहे.
बिंदुसरा नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने तो यापूर्वीच बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल उभारण्यात आला. हा पूल आठ दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसात खचला. त्यात टेम्पो उलटून अपघातही झाला होता. दरम्यान, जेथे पूल खचला होता तेथे केवळ मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. त्यामुळे हा पूल पुन्हा धोकादायक ठरु शकतो, या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन ते निदर्शनास आणले होते. त्यावरुन शनिवारी जिल्हाधिकारी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून रस्ता सुरक्षा बैठकही घेतली. रविवारी दुपारी मंडळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले. अवजड वाहतूक मांजरसुंबा - गढीमार्गे तर बस वाहतूक शहरातून वळविली आहे.