लोकशाहीचा अधिकार उदध्वस्त करणारी प्रवृत्ती बंद करा
By Admin | Updated: October 7, 2014 00:15 IST2014-10-07T00:12:10+5:302014-10-07T00:15:18+5:30
परभणी: चार-दोन पैशांच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात बळावली आहे.

लोकशाहीचा अधिकार उदध्वस्त करणारी प्रवृत्ती बंद करा
परभणी: चार-दोन पैशांच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात बळावली आहे. या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून ही प्रवृत्ती बंद करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना केले.
परभणी विधानसभा मतदारसंघातील राकाँचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ परभणी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खा.गणेशराव दुधगावकर, अॅड. सुरेश जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आ.रामराव वडकुते, माजी मंत्री फौजिया खान, उमेदवार प्रताप देशमुख, मधुसूदन केंद्रे, भीमराव हत्तीअंबिरे, स्वराजसिंह परिहार, बाळासाहेब जामकर, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, दादासाहेब टेंगसे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जिल्ह्यातील दिग्गज नेते सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोर्डीकर, सीताराम घनदाट यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यास एका आमदारास कोर्ट परवानगी देत नाही. या प्रकारचा विक्रम महाराष्ट्रात कोठेही झालेला नाही. त्यामुळे आमदारांची प्रतिष्ठा कमी झाली आहे. ही अशोभनिय बाब आहे. यामध्ये दुरुस्ती करुन या प्रवृत्ती दूर करा. सहकारी चळवळीला आपण शक्ती दिली. परंतु, सहकारी संस्था, बँका उद्ध्वस्त करण्याचे काम काहींनी केले. यापासून जिल्ह्याला वाचवा, असेही त्यांनी आवाहन केले. बाबासाहेब गोपले, आ. वडकुते, अॅड. दुधगावकर, अॅड. जाधव आदींसह उमेदवार देशमुख, भांबळे, दुर्राणी यांनी मनोगत व्यक्त केले. देशमुख यांनी परभणी शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार तर जवंजाळ यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
गंगाखेडसारखा मतदारसंघ महाराष्ट्रात नाही
आपल्या राजकीय जीवनात १४ निवडणुका लढविल्या. सर्वच जिंकल्या. परंतु, गंगाखेड सारखा मतदारसंघ पाहिला नाही. या मतदारसंघाची चांगलीच चर्चा राज्यपातळीवर ऐकावयास मिळत आहे. निवडणुकीच्या आधी महिनाभर येऊन काही मंडळी ‘मॅनेजमेंट’ करतात. सर्व व्यवस्था ठिकठाक करतात. गंगाखेडचे मतदारही त्यांना मतदान करतात. आम्ही मात्र विकासाची कामे करतो. तरीही जनतेला आमच्याकडून अपेक्षा असतात. या मतदारसंघात मात्र भलतेच घडते.पैशाच्या जोरावर लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त करणारी ही प्रवृत्ती बंद केली पाहिजे व स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी केंद्रातील सरकारने ‘अच्छे दिन आयेंगे’असे स्वप्न दाखविले. परंतु, या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जात नाही. परकीय चलन एका बाजूने जात आहे. दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे. जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. नव्या नेतृत्वाची फळी समोर आली पाहिजे. राज्यात राष्ट्रवादीचे सरकार आल्यास एलबीटी, शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यात येतील, असे ही ते म्हणाले.
महापौर प्रताप देशमुख यांनी शहरात केलेल्या विकासकामांचे शरद पवार यांनी कौतुक केले व देशमुख यांचे चांगले काम असल्याने त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी उमेदवार प्रताप देशमुख यांनी एल.बी.टी. किंवा जकात कर असा कुठलाही कर न लावता महापालिकेला शासकीय अनुदान द्यावे, अशी मागणी केली.