तुपे यांच्या रूपाने कदम-दानवे युती घट्ट
By Admin | Updated: April 26, 2015 01:02 IST2015-04-26T00:53:47+5:302015-04-26T01:02:08+5:30
औरंगाबाद : महापौरपदासाठी २९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीतर्फे ज्येष्ठ नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना उमेदवारी देऊन

तुपे यांच्या रूपाने कदम-दानवे युती घट्ट
औरंगाबाद : महापौरपदासाठी २९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीतर्फे ज्येष्ठ नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना उमेदवारी देऊन पालकमंत्री रामदास कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोघांमधील ‘युती’ घट्ट केल्याचे दिसत आहे.
महापालिका निवडणूक निकालात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेत महापौरपदासाठी स्पर्धा सुरू झाली. निवडणुकीच्या आधीही त्र्यंबक तुपे यांच्यासह राजू वैद्य, विकास जैन, नंदकुमार घोडेले ही मंडळी स्पर्धेत होतीच. त्यापैकी विकास जैन हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे तेच महापौरपदाचे उमेदवार असतील अशी अटकळ बांधली जात होती. नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी युतीचे बहुमत नसताना जोडतोड करून आपल्या पत्नीला महापौर केले.
आताही बहुमत नसल्याने घोडेले यांचे नाव पुढे आले होते. महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी असल्याचे जाहीर झाल्यापासूनच रेणुकादास ऊर्फ राजू वैद्य यांनी तयारी सुरूकेली होती. निवडणुकीच्या आधी त्यांचेच नाव अग्रेसर होते. मात्र, उमेदवारीवरून विद्यानगरात एका कार्यकर्त्याला केलेली हाणामारी वैद्य यांना चांगलीच भोवली. पालकमंत्री कदम यांनी जाहीर वाच्यता करून त्यांचा पत्ता आधीच कट केला होता.
जैन हे पालकमंत्र्यांच्या जवळचे आणि चंद्रकांत खैरे यांच्या विरोधी गटातले मानले जातात. त्यामुळे त्यांचे नाव अग्रक्रमावर होते. त्र्यंबक तुपे हेही आधीपासूनच स्पर्धेत होते. पालकमंत्री रामदास कदम यांनी आधीच जाहीर केले की, महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आहे त्यामुळे महापौरपदाचा उमेदवारही सर्वसाधारण गटातील वॉर्डातीलच हवा. त्यामुळे तुपे यांनाच उमेदवारी मिळेल, हे स्पष्ट झाले होते.
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचाही तुपे यांच्या नावाला पाठिंबाच मिळाला. महापौरपदासाठी दावा करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले होते. मात्र, त्यांचा हा दावा सत्तेत पन्नास टक्के वाटा मिळावा यासाठी होता. सेनेनेही तुपे यांचे नाव पुढे करून खा. दानवे यांची एकप्रकारे कोंडीच केली.