तुळजापूर नगरी फुलली
By Admin | Updated: April 11, 2017 00:05 IST2017-04-11T00:02:16+5:302017-04-11T00:05:02+5:30
तुळजापूर : हातात झांज, डोईवर गाठोडे, गळ्यात कवड्याची माळ, हलगीच्या वाद्यावर देवीगीत गात हजारो भाविक सोमवारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरात व मंदिरात दाखल झाले.

तुळजापूर नगरी फुलली
तुळजापूर : हातात झांज, डोईवर गाठोडे, गळ्यात कवड्याची माळ, हलगीच्या वाद्यावर देवीगीत गात हजारो भाविक सोमवारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शहरात व मंदिरात दाखल झाले. यामुळे सायंकाळी पाचनंतर तुळजापूर तुळजापूर देवीभाविकांनी फुलून गेले होते. वाढत्या गर्दीमुळे पुजारी, व्यापारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.
सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी चैत्री पौर्णिमा साजरी होणार असल्याने सोमवारी सायंकाळी पाचनंतर हजारो भाविक शहरात दाखल झाले. यात खाजगी वाहनांनी विशेषत: टेंपो, ट्रक, जीप यांनी तसेच काही भाविक पालखी घेऊन चालत, तर काही भाविक बसने देवी दर्शनासाठी दाखल झाले होते. दुपारनंतरही भाविकांचा ओघ सुरूच होता. मात्र, कडक उन्हामुळे अनेक भाविकांनी वाहनतळ व महाद्वार विसावा कक्षात विश्रांती घेणे पसंत केले. व्यापाऱ्यांनी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आपापल्या प्रसाद दुकानांसमोर नेट बांधून सावली तयार केली. त्यामुळे भर उन्हातही भाविक प्रसाद, खेळणी, देवी फोटो, कवड्याच्या माळा हे साहित्य खरेदी करताना दिसत होते.
शहरातील पाणीपोईवर थंड पाणी पिण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. गाड्यावरीेल थंडगार शरबत, पायनापल ज्यूस यालाही मोठी मागणी होती. वाढत्या गर्दीमुळे फळेविक्रेत्यांचाही मोठा फायदा झाला. केळी, द्राक्षे, चिक्कू, कलिंगड, काकडी, कैरी यांना भाविकांची मोठी मागणी दिसून आली. (वार्ताहर)