खुलताबादेत तहसील व महावितरणमध्ये थकबाकीवरून जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:01 IST2018-03-12T18:59:26+5:302018-03-12T19:01:07+5:30
खुलताबाद तहसील व महावितरणमध्ये थकबाकीवरून चांगलीच जुंपली आहे. आज सकाळी तहसील कार्यालयाच्या विद्यूत बीलाच्या थकीत रक्कमेपोटी महावितरणने तेथील वीजपुरवठा खंडित केला. तर दुसरीकडे अकृषिक कर थकविल्याने तहसील प्रशासनाने महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय सील केले.

खुलताबादेत तहसील व महावितरणमध्ये थकबाकीवरून जुंपली
खुलताबाद (औरंगाबाद ): खुलताबाद तहसील व महावितरणमध्ये थकबाकीवरून चांगलीच जुंपली आहे. आज सकाळी तहसील कार्यालयाच्या विद्यूत बीलाच्या थकीत रक्कमेपोटी महावितरणने तेथील वीजपुरवठा खंडित केला. तर दुसरीकडे अकृषिक कर थकविल्याने तहसील प्रशासनाने महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय सील केले.
तहसील कार्यालयाकडे विद्यूत बीलाची 2 लाख 56 हजार रूपये एवढी थकीत रक्कम आहे. याच्या वसुलीसाठी आज दुपारी महावितरणच्या कर्मचा-यांनी तेथील विद्यूत पुरवठा कुठलीही पुर्वसुचना न देता खंडित केला. यामुळे कार्यालयाचे संपुर्ण कामकाज ठप्प झाले. दरम्यान महावितरणच्या या भूमिकेवर तहसीलदार डॉ. अरूण ज-हाड यांनी रोष व्यक्त केला. यानंतर तहसील प्रशासनाने आक्रमक होत सांयकांळी पाच वाजेच्या सुमारास महावितरणकडे थकीत असलेल्या 33 लाख 68 हजार 438 रूपये अकृषिक कराच्या वसुलीसाठी पथक नेमले. या पथकाने वारंवार सूचना करूनही कर न भरल्याने महावितरणचे उपविभागीय अभियंता कार्यालयास सील ठोकले.तसेच नगर परिषद कॉलनीतील वीजबील भरणा केंद्रांलाही सील ठोकले. या पथकात तहसीलदार डॉ.अरूण ज-हाड, मंडळ अधिकारी विलास सोनवणे, तलाठी सचिन भिंगारे, नामदेव कुसनूरे, अशोक गर्गे, शेख जमील यांचा समावेश होता. तहसीलच्या या कारवाईने मात्र त्यांनी महावितरणाला जशास तसे उत्तर दिल्याची चर्चा शहरात सुरू होती.