‘मन्याड’चे पाणी बिलोणीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत
By Admin | Updated: August 4, 2014 01:55 IST2014-08-04T01:32:32+5:302014-08-04T01:55:18+5:30
वैजापूर : प्रत्येकाने स्वत:सह गावाच्या विकासाचा संकल्प केल्यास आपल्याला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही.

‘मन्याड’चे पाणी बिलोणीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत
वैजापूर : प्रत्येकाने स्वत:सह गावाच्या विकासाचा संकल्प केल्यास आपल्याला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही. प्रशासनही नेहमी तुमच्यासोबतच राहील, असे आश्वासन देत विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी वैजापूर तालुक्यातील मन्याड प्रकल्पाचे पाणी बिलोणीपर्यंत आणण्याची बाब आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास आपण नक्की प्रयत्न करू, तसेच तज्ज्ञांमार्फत तांत्रिक छाननी केली जाईल, असे प्रतिपादन केले.
तालुक्यातील बिलोणी येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ग्रामसेवा दिन व स्वर्णजयंती अभियानांतर्गत समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. आर.एम. वाणी, माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पं.स. सभापती बिजला साळुंके, उपसभापती विमल पवार, जि.प. सदस्य दीपकसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.
जैस्वाल पुढे म्हणाले की, एका महिन्यात बिलोणी गाव प्रमाणपत्रमुक्त बनविण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केली. ग्रामस्थांनी मनरेगातून जलसंवर्धनाची जास्तीत जास्त कामे करावीत, तसेच गाव १०० टक्के हगणदारीमुक्त करावे. घरटी शौचालय बांधून त्यांचा वापर सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाकडे प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी योजना आहे, तिचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. यावेळी आ. वाणी, माजी आ. कैलास पाटील चिकटगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या समाधान शिबिरात विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना आढळून आले. यावेळी माजी पं.स. सभापती बाबासाहेब जगताप, अंकुश हिंगे, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी मुनीर शेख, नायब तहसीलदार अभय बेलसरे यांची उपस्थिती होती.