ट्रक-जीपच्या धडकेत तिघे जागीच ठार

By Admin | Updated: June 12, 2014 01:39 IST2014-06-12T01:10:23+5:302014-06-12T01:39:16+5:30

उस्मानाबाद : भरधाव जीपची ट्रकला समोरून जोराची धडक बसल्याने झालेल्या भिषण अपघातात एका प्राध्यापकासह तिघे जण जागीच ठार झाले

The truck-jeep killed three people on the spot | ट्रक-जीपच्या धडकेत तिघे जागीच ठार

ट्रक-जीपच्या धडकेत तिघे जागीच ठार

उस्मानाबाद : भरधाव जीपची ट्रकला समोरून जोराची धडक बसल्याने झालेल्या भिषण अपघातात एका प्राध्यापकासह तिघे जण जागीच ठार झाले असून, शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवानंद रोचकरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ ते सांगवी यादरम्यान घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवानंद रोचकरी यांचा २० जून रोजी वाढदिवस आहे. याच्या तयारीसाठीच रोचकरी व त्यांचे अन्य तिघे सहकारी बुधवारी रात्री सोलापूरमार्गे मुंबईकडे निघाले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास सिंदफळ ते सांगवी या दरम्यान त्यांची जीप आली असता समोरून येणाऱ्या ट्रकला या जीपची जोराची धडक बसली. या अपघातात जीपमधील प्रा. किसन उध्दव जाधव (वय ५०), बापू नाईकवाडी (वय ५०) व चालक मंगेश (वय ४०, सर्व रा. हल्ली तुळजापूर) हे तिघे जागीच ठार झाले. तर देवानंद रोचकरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यावरून रोचकरी यांना सोलापूर येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कसलीही नोंद झालेली नव्हती.

Web Title: The truck-jeep killed three people on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.