ट्रकची दुचाकीला धडक; आजीसह नातवाचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: March 18, 2017 23:43 IST2017-03-18T23:42:12+5:302017-03-18T23:43:03+5:30
उस्मानाबाद : ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने आजीसह तिच्या दीड वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला़

ट्रकची दुचाकीला धडक; आजीसह नातवाचा जागीच मृत्यू
उस्मानाबाद : भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका आजीसह तिच्या दीड वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी सकाळी उस्मानाबाद-औसा राज्य मार्गावरील समुद्रवाणी पाटीजवळ घडली़
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी तांडा येथील अंबादास भगवान पवार हे शनिवारी सकाळी त्यांची आई इंदूबाई भगवान पवार (वय-४५) व पुतण्या नागेश्वर अमोल पवार (वय दीड वर्ष) यांना मोटारसायकलवर (एमएच-०३/जे-५९८१) घेवून तांड्याकडे येत होते. समुद्रवाणी पाटीहून वळण घेवून औसा रस्त्याने येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच-२५/बी-९२४८) जोराची धडक दिली़ या अपघातात इंदूमती पवार व दीड वर्षीय नागेश्वर अमोल पवार हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. या अपघातात मोटारसायकलस्वार अंबादास पवार हे मात्र बालंबाल बचावले़ अपघातानंतर ट्रकमधील वऱ्हाडी मंडळींपैकी एकानेही अपघातग्रस्तांची मदत केली नाही. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला़
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे व बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस नाईक एस. एस. सुरवसे, पोलीस हवालदार एच. एस. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. मयत इंदूबाई पवार व नागेश्वर पवार यांचे प्रेत पाडोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. जखमी अंबादास पवार यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांच्या माहितीवरून ट्रकचालकाविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)