नळतोडणीमध्ये गैरप्रकार !

By Admin | Updated: March 16, 2015 00:49 IST2015-03-16T00:40:24+5:302015-03-16T00:49:48+5:30

उन्मेष पाटील, कळंब नगर परिषदेमध्ये सन २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडणी तोडण्याच्या कामामध्ये अपहार झाल्याची गंभीर तक्रार

Troubleshooting malpractices! | नळतोडणीमध्ये गैरप्रकार !

नळतोडणीमध्ये गैरप्रकार !


उन्मेष पाटील, कळंब
नगर परिषदेमध्ये सन २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडणी तोडण्याच्या कामामध्ये अपहार झाल्याची गंभीर तक्रार पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे बालोद्यान साहित्य घोटाळा, शौचालय घोटाळ्यानंतर हा आणखी एक घोटाळा समोर आल्याने न.प. वर्तुळात खळखळ उडाली आहे.
शहरातील प्रदीप सुभाष पांचाळ यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून माहिती अधिकाराच्या माध्यमातून हा घोटाळा समोर आणला आहे. शहरातील मुख्य नळवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचा ठराव १६ फेब्रुवारी २०१२ च्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु त्या ठरावामध्ये ‘सुमो हॉटेलसमोरील नाली साफ करणे’ या कामाचा समावेश नव्हता. तरीही या कामाचे बिल क्र. २७, २२ मार्च २०१२ रोजी सादर करण्यात आले व ते संबंधित ठेकेदारास अदाही करण्यात आले.
या दोन्ही कामाचे बील एकरकमी व एकत्रितपणे अदाई करण्यासंदर्भात न. प. चे अभियंता जे. सी. बावळे यांनी ९ एप्रिल २०१२ रोजी टिप्पणी देऊन बिल अदा करण्यासंदर्भात टिप्पणी दिली होती. परंतु त्यापूर्वीच नऊ दिवस आधी म्हणजे ३१ मार्च २०१२ रोजी तत्कालिन मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चेक क्र. ७७०७३६ ने बिल संबंधितास देण्यात आले.
न.प. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर प्रशासनाने या कामाचे बिल अदा करण्यासाठी तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी एकाच कामाचे दोन वेगवेगळ्या दिनांकाचे आदेश दिले आहेत. त्याहून कहर म्हणजे या कामांच्या बिलाच्या देयकानंतरच्या तारखेत हे आदेश काढण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येत आहे. सदरील काम हे मराठवाडा अर्थ मुव्हर्स या संस्थेच्या नावावर करण्यात आल्याचे कागदावर दाखविले आहे. परंतु याबाबत दुकाने निरीक्षक कळंब यांच्याकडे माहिती घेतली असता हे दुकान किंवा आस्थापना त्या व्यक्तीच्या नावावरच नसल्याचे समोर आले आहे. म्हणजे या कामाचे बिलही बनावट व्यक्तीच्या नावावर उचलण्यात आल्याचे स्पष्ट आहे. दुकाने निरीक्षकांनी ही संस्था मुश्ताक गफूर खाटीक (कुरेशी) यांच्या मालकीची असल्याचे लेखी कळविले आहे. कुरेशी हे सध्या कळंब न. प. चे उपनगराध्यक्ष आहेत, असेही पांचाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आणल्यामुळे संबंधितांकडून आपल्या जिवितास धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून या प्रकरणी कळंब पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी पांचाळ यांनी ‘एसपीं’कडे केली आहे.

Web Title: Troubleshooting malpractices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.