परळी : तडस आढळल्याने तालुक्यातील तळेगावसह इतर तीन गावांतील ग्रामस्थ पुरते हादरुन गेले आहेत. वनविभागाने सतर्कता म्हणून शनिवारी रात्रीच पिंजरा लावला आहे. दुसऱ्या दिवशीही अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. तळेगाव येथील आत्माराम मुंडे हे शनिवारी सायंकाळी शेतातून घरी परतत होते. यावेळी त्यांना वाघासारखा एक प्राणी आढळला. त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. ते भयभीत अवस्थेत गावात धावतच आले. त्यांनी वाघ दिसल्याचे सांगताच सर्व गावकरी गोळा झाले. त्यांनी वनविभाग व तहसील प्रशासनाला यासंदर्भात कळविले. त्यानंतर तळेगाव परिसरातील कौठळी, इंजेगाव, पांगरी या गावातील नागरिकांना भ्रमणध्वनीवरुन सावधानतेचा इशारा दिला. दरम्यान, वाघाच्या भीतीने चारही गावांतील नागरिक रात्रभर जागले. काहींनी तर भीतीपोटी जेवणही केले नाही. रात्रभर भ्रमणध्वनीवरुन एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून सुरक्षेची खबरदारी घतली जात होती.तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी गावातवाघाच्या दहशतीने गावकरी हैराण असल्याचे कळाल्यावर तहसीलदार डॉ. विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुंद मुंडे यांनी तळेगावात जाऊन गावकऱ्यांना दिलासा दिला. त्यानंतर लगेचच गावाबाहेरील वनक्षेत्रात पिंजराही लावला. अधिकारी-कर्मचारी रात्री उशिरापर्यंत गावात तडसाचा शोध घेत होते. (वार्ताहर)
तडसाचा संचार; चार गावे भयभीत
By admin | Updated: April 4, 2016 00:41 IST